पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२

महाराजांवर सक्त नजर ठेवण्यास सुरवात केली. अर्थात् बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराजांस मन मानेल तसे वागू न दिल्यामुळे, हें प्रकरण जास्तच विकोपास गेलें; व पुढे नामदार गव्हरनर जनरल लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांस इकडे लक्ष्य पोहोंचविणें भाग पडलें.

 बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराज जनकोजीराव ह्यांस फार वाईट रीतीनें वागविलें, असा त्यांच्यावर कित्येक इतिहासकारांचा आरोप आहे. परंतु तो वास्तविक खरा नसून, त्यांत अतिशयोक्ति फार आहे. सुरेंद्रनाथ राय नामक ग्वाल्हेरच्या एका इतिहासकारांनीं, इंग्रजी ग्रंथकारांचा अनुवाद करून, बायजाबाईसाहेब व जनकोजीराव ह्यांच्या कलहासंबंधाने लिहितांना असें ह्मटलें आहे कीं, "बाईंनीं आपल्या अज्ञान मुलास कोणत्याही प्रकारचें शिक्षण न देऊन संस्थानच्या राजकारणांविषयीं त्यास सर्वथा अज्ञानांधकारांत ठेविलें. त्यांनीं संस्थानचीं भावी राज्यसूत्रें चालविण्यास तो अगदी अपात्र व्हावा असा यत्न केला; व त्यास अयोग्य रीतीनें प्रतिबंधांत ठेविलें. त्याच्या मनाची वाढ खुटावी, स्वावलंबनाचा स्वाभाविक अंकुर त्याच्यामध्ये मुळांतच तुटला जावा, त्यास जगाचें अल्पही ज्ञान मिळूं नये, त्यानें नेहमीं दास्यवृत्तीमध्यें राहून राज्यकारभार हातीं घेण्यास धजू नये, आणि त्याच्या मनांत आपणांविषयीं पोकळदरारा व अमर्याद भीति राहावी, असा बाईंनीं वर्तनक्रम ठेविला."


 1. "The Bai kept her ward devoid of all education, and in profound ignorance of state affairs. She did her best to make him utterly unfit to conduct the future Government of the country, and subjected him to galling restraints. Her policy was to dwarf the growth of his mind, to nip in the bud the native spirit of self-reliance, to keep him in utter ignorance of the world, and to fill his mind with a sort of vague and indefinite fear for her, that in future he might not shake off her thraldom, and take the Government in his own hands &c."

-Gwalior by Roy. Page 333.