पान:बाबुर.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समरकंदला राम राम अशा त-हेने सहा-सात महिने लोटले पण परिस्थितीत सुधारणा कोठेच दिसेना. शैबानीखानाचा दम पहिल्या दिवसाइतकाच ताजातवाना व कणखर होता. शत्रु कोठेच नमला नाही. उलट बाबुर मात्र बेजारगतीस आला. त्याला मदत येण्याची आशा कोठूनही दिसेना. कारण परस्परास साह्य करून सर्वांच्याच उरावर बसणारा शत्रु नाहींसा करणे हे त्या लोकांस माहीत नव्हते. जात्यांत भरडले जाणारे रडते म्हणून सुपांतल्याने खदखदा हसण्यांतलाच हा प्रकार होता. बाबुराचे सामर्थ्यवान् भाऊबंद दुरून मजा पाहात होते. कोणाकडूनही कसलीही मदत येत नव्हती, येण्याची आशा नव्हती. अपयशाचा राक्षस बाबुराचा ग्रास करण्यासाठी झपट्याने पावले टाकीत होता. समरकंदमध्ये भयंकर परिस्थिति झाली होती. अन्नाचा कण नव्हता. भुकेनें लोक व्याकूळ झाले होते. भुकेला कोंडा म्हणतात तेच खरे. लोकांनी काय वाटेल ते खाण्यास सुरुवात केली. गाढवे, घोडी, कुत्री यांच्यावर उदरनिर्वाह करण्यास सुरुवात झाली. आतां एकेक दिवस ढकलावयाचा म्हणजे प्राणसंकट वाटू लागले. शैवानीखानाची चिकाटी जबरदस्त होती व त्यांतून सुटका होण्याचा मार्ग कोठेच दिसेना. निराशा-दारुण निराशा होऊन चित्तवृत्ति भांबावून गेल्या. बाबुरास पळून जाण्याशिवाय गत्यंतर दिसेना. बाबुरासारख्या मानधनास या प्रसंगाने काय वाटले असेल याची कल्पनाच करवत नाही. पण ह्या दारुण दुःखाचा प्याला बाबुर पुन्हा एकदां मुकाट्याने प्याला आणि त्याने समरकंदला राम राम ठोकला. तसे करतांना त्याला प्राणांतिक यातना झाल्या. त्याची आई, आजी, बायको आणि बहीण इतक्या स्त्रिया त्याच्याबरोबर होत्या. त्यांची रवानगी सुखरूपपणे करणे हे एक मोठे अवघड व नाजूक काम होते. ते त्याने केले, पण त्या धांदलीत त्याची बहीण शत्रूच्या हाती लागली. वस्तुतः ते तसे नव्हते. बाबुराच्या बहिणीचे शैबानीखानावर प्रेम होते आणि ही संधि साधून ती त्याच्या जनानखान्यांत दाखल झाली.