पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बिळिगिरी रंगाचा निराशाजनक अनुभव कर्नाटकात नीलगिरीच्या पूर्वेला बिळिगिरी रंगाचा वनाच्छादित पर्वत आहे. ह्या पर्वतराजीत शोलिगा आदिवासी पिढ्यान् पिढ्या राहत आले आहेत. पूर्वी ते शिकार आणि फिरती शेती करायचे. डोंगराच्या एका शिखरापाशी त्यांची एक सुंदर देवराई आहे, त्यात सोनचाफ्याचा प्रचंड वृक्ष आहे, त्याची ते पूजा करतात. इथे अभयारण्य प्रस्थापित झाल्यावर शिकार बंद झाली, फिरत्या शेतीवरही बंधने आली. तेव्हां आवळा, मध, औषधी वनस्पती इत्यादी गोळा करणे शोलिगांच्या उपजीविकेचा आधार बनले. विवेकानंद गिरिजन कल्याण केन्द्र या संस्थेने शोलिगांबरोबर चांगले काम करून त्यांना संघटित केले. १९९५ पासून त्यांच्या सहकारी संघाबरोबर काळजीपूर्वक वनोपज गोळा करणे, त्यावर संस्करण करणे, विक्री करणे असे उपक्रम सुरु केले. जोडीने अट्री नावाची शास्त्रीय संस्था या वनराजीचा व तीवर शोलिगांच्या वनोपज संग्रहणाचा काय परिणाम होतो याच्या अभ्यासास लागली. अभ्यासात असे आढळून आले की शोलिगांचे वनोपज संग्रहण पूर्णपणे चिरस्थायी पद्धतीने चालले आहे. त्याच्यावर संस्करण करणेही सुरु झाल्याने त्यांचा चरितार्थ बरा चालला आहे. दुर्दैवाने २००५ फेब्रुवारीमध्ये वनविभागाने वन्यजीव कायद्याप्रमाणे विक्रीसाठी वनोपज गोळा करणे बेकायदेशीर आहे असे फर्मान काढून त्यांच्या पोटावर पाय आणला आहे. सरिश्कातील भ्रष्टाचार दिल्लीजवळचा सरिश्का व्याघ्रप्रकल्प हे पर्यटकांचे आवडते स्थान आहे. २००३ पासून तेथे वाघ दिसणे दुर्मिळ होऊन बसले होते. परंतु वनखात्याने प्रसृत केलेल्या माहितीप्रमाणे तेथे भरपूर वाघ हिंडत होते. असे का? जेव्हां वाघ अजिबातच दिसत नाहीत अशा तक्रारी वाढल्या तेव्हां सरकारने सीबीआय तर्फे चौकशी करवली. या चौकशीत सिद्ध झाले की २००४ पर्यंत चोरट्या शिकारीतून इथले सारे वाघ मारले गेले होते. अशा शिकारी होत असताना वाघाची कातडी सोलून, त्याचे कलेवर तेथेच टाकून गेल्याच्याही घटना झाल्या होत्या. अशा वेळी प्रचंड दुर्गधि सुटते आणि ही घटना वनखात्याच्या कर्मचा-यांच्या अधिका-यांच्या लक्षात न येणे शक्यच नव्हते. तेव्हां या चोरट्या शिकारीत जसे बाहेरचे पारधी-गावकरी यांचा सहभाग असावा, तसेच वनविभागाचेही संगनमत असावे असा स्पष्ट निष्कर्ष सीबीआयने काढला. परंतु अखेर अनेक गावकरी व इतर दुर्बल वर्गातील लोकांची पिटाई झाली. एकाही शासकीय कर्मचा-याला,-अधिका-याला जबाबदार ठरवण्यात आले नाही. चोरट्या शिकारीत हातमिळवणी करण्याच्या या शासनयंत्रणेच्या अगदी उलटा अनुभव अनेक वेळा लोकांनी चिंकारा-काळवीटांची शिकार पकडून देण्याच्या बाबतीत घडलेला आहे. सल्मान खान व पतौडीचा नबाब या दोन सुविख्यात व्यक्तींच्या चोरट्या शिकारीचा अलीकडचा इतिहास तर खूपच गाजला आहे. नुकताच असाच आरोप महाराष्ट्राचे माजी मंत्री धर्मराव अत्राम यांच्यावरही करण्यात आला आहे.