पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मूल्याचे आंबे पुरवायचे. असे वृक्ष दर झाडामागे केवळ ६० रुपये घेऊन प्लायवुड कंपन्यांना देण्यात आले. पण जेव्हा हेही संपले, तेव्हां या कंपन्यांनी सरकारला पटवून दिले की आता आम्हाला देवराया खुल्या करून द्या. ह्यातल्या काही देवराया शंभर शंभर हेक्टरच्या होत्या. सरकारने १९७२ साली फर्मान काढून त्यातल्या कित्येक देवरायांचा नाश केला. बेडतीची भ्रष्ट तोड १९७२ च्या सुमारास चिपको, वन्यजीव संरक्षण कायदा, व्याघ्र प्रकल्प असे नवे वारे वाहू लागले होते. याचाच पुढचा टप्पा म्हणून १९७७ मध्ये योजना आयोगाने सर्व मोया प्रकल्पांनी प्रकल्पाचे पर्यावरणावर काय परिणाम होतात याचे परीक्षण करणे सक्तीचे केले. असे एक परीक्षण कर्नाटकातल्या कारवार जिल्ह्यातल्या बेडती नदीवरच्या जलविद्युत् प्रकल्पाचे करणे आले. यासाठी जी समिति नेमली गेली, तिचा मी एक सदस्य होतो. हे सर्व परीक्षण अगदी असमाधानकारकरीत्या करून प्रकल्पाला मंजुरी दिली गेली, म्हणून याच्या निषेधार्थ मी स्थानिक लोकांच्या सहभागाने एक स्वतंत्र परीक्षण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या समितीचा सदस्य म्हणून माझ्यापाशी प्रकल्पाचा सर्व तपशील, नकाशे होते. प्रत्यक्ष जमिनीवर काम सुरु केल्यावर आम्ही संकल्पित धरणाखाली बुडणारे जंगल कसे आहे याचे निरीक्षण सुरु केले. तेव्हां आढळले की एक अतिशय दाट व उत्तम जंगलपट्ट्याची तोड झाली होती. ही वृक्षराजी तर बुडणार नव्हतीच. शिवाय अजून प्रकल्पाला अधिकृत संमतीही मिळाली नव्हती. मग काय होत होते? काही भ्रष्ट अधिका-यांनी मुद्दामच चुकीची आखणी करुन घाईगर्दीने सर्वात समृद्ध वनप्रदेशाची तोड सुरू केली होती. कुंपणच शेत गिळंकृत करत होते. संयुक्त वनव्यवस्थापनाची नांदी | एकूण १९५२ च्या वननीतीत ज्या पर्यावरणाचे जतन करायच्या, टिकाऊ पद्धतीने वनसंपत्तीचा वापर करायच्या, बाता केल्या होत्या, त्या १९७२ पर्यंत पूर्ण पोकळ होत्या हे। स्पष्ट होत होते. या १९५२ च्या वननीतीत लोकांचे सहकार्य फार महत्वाचे आहे, पण त्यांना काहीही हाती लागू न देता ते मिळवावे अशी पूर्ण निरर्थक विधाने होती. त्यांचा आता जरा फेरविचार सुरु झाला. लोकांना सहभागी करण्याचा प्रयोग सुरु झाला पश्चिम बंगालातल्या मिदनापूर जिल्ह्यातल्या आराबारीत. इथली सालाची जंगले पूर्ण तोडली गेली होती. पण बुंधे-मुळ्या शाबूत होत्या, आणि जर रक्षण केले तर फुटव्यांपासून साल पुन्हा छान वाढू शकतो. एका प्रगतिशील वनाधिका-याने स्वतःच्या जबाबदारीने लोकांना आवाहन केले की तुम्ही याचे रक्षण करा; त्या वनोपजावर-सालाची पत्रावळ्यांसाठी वापरली जाणारी पाने, व सालाच्या तेलबिया- तुमचा अधिकार राहील. एवढेच नाही तर जेव्हां झाडे नीट वाढून लाकूड तोड होईल, तेव्हां त्या लाकूड उत्पादनात तुम्हाला काही हिस्सा मिळेल. हे सगळे अनौपचारिकरीत्या सुरु झाले. हा कार्यक्रम हाती घेताना संयुक्त वनव्यवस्थापनासाठी १९२७च्या कायद्यातील ग्रामवनांची तरतूद वापरणे श्रेयस्कर ठरले