पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अशीच चुकीची माहिती महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वनावरणाबद्दल प्रसृत केली जाते. सर्व प्रकाशनांत रत्नागिरीत जंगल नाहीच असे दाखवले जाते. पण हे केवळ तेथील जंगल वनविभागाच्या ताब्यात नाही म्हणून सांगण्यात येते. जमिनीवर अगदी वेगळे चित्र दिसते. एका अंदाजाप्रमाणे आजमितीस रत्नागिरी जिल्ह्याच्या ४८ टक्के भूमीवर जंगल उभे आहे. एकदा रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला आलो की मगच वनश्री खास दुर्दशेला पोचलेली दिसते. याचे कारण काय? जरा खोलात शिरून पाहिल्यावर लक्षात येते की सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जी बरीचशी वनराजि सुस्थितीत आहे, ती सारी खाजगी मालकीच्या जमिनीवर आहे. ही पूर्वी एक- दोनदा तोडलीही गेली होती. परंतु लोकांनी पुन्हा काळजीपूर्वक वाढवली आहे. पण उत्तरेला बहुतेक सर्व डोंगर उतार वन खात्याच्या अखत्यारीत आहेत, आणि ते अगदी दुःस्थितीत आहेत. क्वचित् वनखात्याच्या काबूतील प्रदेशात जंगल-झाडोरा भेटतोही. पण जरा जवळ जाऊन पाहिले की दिसते की इथे आहेत हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच जाती. उभा महाराष्ट्र पालथा घातला, तरी सरकारी प्रयत्नातून लागवड झालेल्या फक्त पाच जाती भेटतात. सागवान, ऑस्ट्रेलियन अकेशिया, नीलगिरी, सुबाबूळ आणि ग्लिरिसीडिया. ह्या उलट रत्नागिरीच्या खाजगी जमिनीवरच्या जंगलांत वृक्षराजीचे भरपूर वैविध्य अजूनही भेटते. याच जिल्ह्यांत लोकांनी जतन करून ठेवलेल्या देवराया आहेत, त्यांच्यात तर सह्याद्रीच्या मूळच्या वनराजीचे खरे वैविध्य पहायला सापडते. दुर्दैवाने वन खात्याने सामाजिक वनिकीच्या नावाखाली ह्यातल्याही काही तोडून त्यांवर निलगिरी वाढवला आहे. | हा असा वास्तवाची कदर न करणार अशास्त्रीय वन व्यवस्थापनाचा उद्योग चालू शकला, याचे कारण एकच. ते म्हणजे विज्ञानाच्या परंपरेप्रमाणे सर्व माहिती सर्वांपुढे मांडून पडताळून पाहणे अशी पद्धति सरकारी प्रणालीला पूर्ण अमान्य आहे. हा सरकारी खाक्या काही नवीन नाही. ताओ-ते-चिंग ह्या प्राचीन चिनी ग्रंथातही हीच मांडणी केली आहे: “पुरातन काळी सन्मार्गाने जाणाच्या शहाण्यांनी, जनतेला केव्हांच ज्ञान पुरवले नाही. उलट लोकांना गोंधळात पाडण्यासाठीच त्यांनी स्वतःचे ज्ञान वापरले. फार जाण असलेल्या लोकांवर राज्य करणे अवघड असते. म्हणूनच ज्ञानाच्या आधारावर राज्य चालवायला पाहिले तर शासननौका डुगमुगायला लागते. उलट अज्ञानाच्या आधारावर चालवलेल्या राज्याला स्थैर्य लाभते.” विध्वंसक वापर तर इंग्रजांनीही अशीच अज्ञानाच्या आधारावर चालणारी वनव्यवस्था लोकांना अंधारात ठेऊन कार्यरत केली. आम्ही शास्त्रोक्त, टिकाऊ पद्धतीने वनव्यवस्थापन करत आहोत. आम्ही भारतात अवतरण्याच्या आधी इथले लोक अविवेकी पद्धतीने जंगलाची नासधूस करत होते असा आव इंग्रजांनी आणला. पण विज्ञानाच्या अधिष्ठानाचे, आणि वनसंपदेकडून मुद्दल पूर्ण राखून केवळ व्याज वापरण्याचे हे फक्त सोंग होते. अनेक वनविभागांत काय करावे ह्या बाबतच्या कार्ययोजना उपलब्ध आहेत. या पाहिल्या तर स्पष्ट दिसून येते की सर्वत्र कालौघात वनसंपत्तीचा व्हास अगदी पहिल्यापासून चाललेला आहे.