पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जिल्ह्यातील पर्वतावरच्या शोलिगा आदिवासींचेच उदाहरण घ्या. पूर्वी हे लोक डोंगरउतारावर फिरती शेती, शिकार करायचे. दोन्ही बंद झाल्यावर ते पूर्णपणे वनोपज गोळा करण्यावर अवलंबून आहेत. यातला एक महत्वाचा माल म्हणजे आवळा. दिवसेंदिवस आवळ्याच्या बिया रुजून, नवीन रोपे वाढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा अभ्यास बेंगलूरूचे काही परिसर शास्त्रज्ञ करीत होते. त्यांचा तर्क होता की फार मोठ्या प्रमाणावर आवळा गोळा केला जात असल्यामुळे हे पुनरुत्पादन घटले आहे. या अनुमानाचा पडताळा घेण्यासाठी त्यांनी प्रयोग सुरू केले. काही भागातील आवळा अजिबात गोळा करायचा नाही, दुस-या भागातील उत्पादनाच्या पाव हिस्सा, तिस-या अर्धा, चौथ्या पाऊण, व पाचव्या संपूर्ण, आणि मग जमिनीवर किती आवळ्याची रोपे वाढतात हे पहायचे. हे संशोधन सुरू झाल्यावर शोलिगांनी सुचविले की, यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण त्यांच्या मते आवळ्याची रोपे जिथे वणवा लागतो तिथेच चांगली फोफावतात. वनविभागाने या वणव्यांवर नियंत्रण आणल्याने आवळ्याचे पुनरुत्पादन कमी झाले आहे. प्रयोगांती शास्त्रज्ञांनी ठरविले की, हे खरे आहे, शोलिगांचाच अंदाज बरोबर असावा. ही शोलिगांची जाणकारी त्यांच्या दैनंदिन जीवनात, आपोआप गोळा झालेल्या अनुभवावर अवलंबून होती. लोकसहभागाने वनांचे, वन्य जीवांचे व्यवस्थापन प्रस्थापित केल्यास लोकांचे हे ज्ञान या निसर्गसंपत्तीच्या सुव्यवस्थापनाचा आधार होऊ शकेल. वैविध्याचा सर्वनाश डीट्रिच बॅडिसना जर्मनीत वनव्यवस्थापनाचा अनुभव होता, तो सारा एकजिनसी चीड अथवा पाइनच्या जंगलांचा. साहजिकच त्यांनी जी वनव्यवस्था भारतात बसवून दिली तिचा रोख होता इथल्या वैविध्यपूर्ण, अनेक त-हेने लोकांच्या जीवनाचा आधार असलेल्या जंगलांचा उच्छेद करून सागवानाचे लाकूड किंवा चीडचा डिंक अशा एखाद्या व्यापारी उत्पादनावर लक्ष केन्द्रित करून एकसुरी जंगल वाढवण्यावर. भारतातल्या जनतेचे जैववैविध्याशी कसे जवळचे नाते आहे याचे एक उदाहरण रायगड जिल्ह्यातल्या कुरवंडा घाटाच्या पायथ्याच्या उंबरखिंडीत पहायला मिळते. इथल्या लोकांनी रूरल कम्यून्स या सेवाभावी संस्थेच्या मदतीने आपल्या टापूतल्या जैवविविधतेची नोंदणी केली आहे. त्यातून कळते की ते उंबर-जांभळांसहित ३० प्रजातींची पिकलेली फळे, वाघेटी- पेंढरी अशी १२ प्रजातींची कच्ची फळे, ओंबली-कशेडी वगैरे ७ प्रजातींच्या बिया, सावर-मोहासारखी ६ प्रजातींची फुले, पेवा-कुरडू इत्यादि ६ प्रजातींची पाने, आणि कडूरकंद-शेवळा सारख्या ८ प्रजातींचे कंद खातात. लोकांना २४० वन्य वनस्पति प्रजाति माहित आहेत, आणि यातील तब्बल १८३ कोणत्या ना कोणत्या प्रकारे, आणि त्यातल्या ५७ आहारात, वापरल्या जातात. आपल्या रानांत असा मेवा आहे. म्हणून तर ऋग्वेदात वनदेवतेची स्तुति केलेली आहे: धूपांनी सुगंधित, वन्य जीवांची माता, आणि जिच्यात शेती नसली तरी जी भरपूर अन्न पुरवते, अशा अरण्यानीचे मी स्तवन करतो. आपली विविधतेने समृद्ध वने ही खरोखरच नानाविध पौष्टिक आहाराची भांडारे आहेत. त्यात सह्याद्रि पर्वतराजी तर जगातील संगोपित ३