पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मगच सर्वांनी मिळून पंडुम” नावाची पूजा करेपर्यंत तोडली जायची नाही. त्यांनी ही परंपरा पुनरुज्जीवित केली. हे करताच त्या वर्षी त्यांचे चारोळीचे उत्पन्न तीस टक्यांनी वाढले ! कारवार जवळच्या एका देवराईचे वर्णन करताना ईस्ट इंडिया कंपनीचा सर्जन बुचानन १८०२ साली लिहतो: “गावचा गौडा ह्या देवाचा पुजारी आहे. त्याच्यामार्फत देवाची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही देवराईला हात लावत नाही. पण ही परवानगी देण्यासाठी तो काहीही पैसे मागत नाही. उघडच आहे की ईस्ट इंडिया कंपनीने आपला कायदेशीर हक्क बजावू नये म्हणून लोकांनी ही क्लुप्ती शोधून काढली आहे. उलट त्यानंतर ऐशी वर्षांनी डीट्रिच बँडिसने ब्रिटिश पूर्व काळाचा महत्वाचा वारसा म्हणून भारतभर पसरलेल्या देवरायांच्या जाळ्याचे कौतुक केले. कोडगू प्रांतातल्या देवरायांचा मुद्दाम उल्लेख केला, आणि इंग्रजांच्या व्यवस्थापनाखाली ह्या भराभर नष्ट होत आहेत याबद्दल खेद व्यक्त केला. राजस्थानातल्या अलवर जिल्ह्यात पूर्वी प्रथा होती की गावाच्या चार दिशांना चार प्रकारची जंगले गाव सांभाळत असे. एका दिशेला कांकडबनी, ज्यातून रोजच्या गरजांकरता वस्तू आणायच्या; रखतबनी दुस-या दिशेला असायची, जेथून अकाल पडला तर वस्तू घ्यायच्या; महाअकाल पडला तरच तिस-या दिशेच्या देवबनीला हात लावायचा आणि देवोरण्याला कधीच हात लावायचा नाही, गाव सोडून जायची वेळ आली तरी हे साठे सांभाळायचे. कर्नाटकातल्या सागर-सोरबा-सिद्धापूर भागात ह्या देवराया अलीकडपर्यंत ब-याच टिकून होत्या. तशाच मणिपूरच्या डोंगराळ भागांतही. त्यांच्या अभ्यासावरुन असे वाटते की सर्व देशभर साधारण १० टक्के भूभाग अशा देवरायांखाली होता. म्हणजे हे जाळे आजच्या अभयारण्य-राष्ट्रीय उद्यानांच्या दुप्पट मोठे होते. त्यात सर्व प्रकारच्या वनराजीचा समावेश होता. त्या सर्व लोकांना सहज आपापल्या पंचक्रोशीत उपलब्ध होत्या, त्यांचा आनंद उपभोगणे शक्य होते. देवरायांची परंपरा ही जरी मानवाच्या निसर्गपूजेच्या परंपरांशी निगडित आहे, तरी या रीतीने सांभाळलेल्या वनराजीतून आपले हितसंबंध जपले जात आहेत याची लोकांना जाणीव असते असे अनेक अनुभव आहेत. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यात एक रहाटी - कोंकणात व घाटमाथ्यावर देवरायांना राहव्या म्हणतात- गारंबीच्या (एन्टाडा फॅझिओलाडेस) प्रचंड वेलाकरता राखलेली आहे. गुरांवर उपचार करण्यासाठी त्याच्या बिया गोळा करायला दूरवरून लोक येतात. झारखंडात गावाच्या प्रवेशद्वाराजवळ बांबूच्या अशाच देवराया राखलेल्या आहेत. सामान्यतः अशा देवराया किंवा रहाटयांतून कोणताही जिन्नस बाहेर नेला जात नाही. परंतु खास आवश्यकता भासल्यास ते केले जाते. उदा. पुणे जिल्ह्यातल्या घोळ गावच्या देवरायांबद्दल सांगितले की पूर्वी एकदा आगीत गावातली सारी घरे खाक झाली, तेव्हां देवीच्या परवानगीने घरे पुन्हा बांधण्यासाठी काही झाडे तोडली होती. इतर देवरायांचा मर्यादित प्रमाणात उपयोग केला जातो. राजस्थानच्या ओरणांत गुरे चारली जातात. काही ओरणांतून हाताने तोडून लाकूड फाटा घेतला जातो, पण लोखंडी कोयती - कु-हाड वापरण्यावर बंदी आहे. श्रीवर्धन तालुक्यातील गाणी