पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जर आपण इतर देशांतील लोकांच्या लक्षात आणून देऊ शकतो तर आपला माल आपण फार मोठ्या प्रमाणावर विकू शकतो. परवा फ्रान्समधले एक प्राध्यापक आले होते. त्यांना आम्ही बाजरीचे छोटे रोटले करून खाऊ घातले. ते म्हणाले, "अशा तऱ्हेचे रोटले, गरम गरम, जर जर्मनी आणि फ्रान्समध्ये मिळायची व्यवस्था झाली तर कोट्यवधी रुपयांचे बाजरीचे रोटले तिकडे विकता येतील." तुम्ही त्यांचा 'ब्रेड त्यांना विकायचा प्रयत्न करू नका. तुमचा माल तुम्ही तयार करायला हवा. मग हे कुठे जमेल? हे तात्यासाहेब कोऱ्यांच्या कुवतीतलं नाही; हे डॉ. कुरियनच्या या कुवतीतलं नाही. हे तुमच्या आमच्या घरच्या 'सीतामायां'च्या कुवतीतलं काम आहे म्हणून माजघरातली शेती असं त्याचं नावं आहे.

 आणखी एक उदाहरण पाहण्यासारखं आहे. पुण्यामध्ये एका शहाण्या माणसानं पोळ्या तयार करण्याचा मोठा कारखाना काढला होता. रोज दोन लाख पोळ्या बनवायच्या. त्या त्यानं प्लास्टिकच्या पिशवीत घातल्या दुकानात मांडल्या. गिऱ्हाईकीच्या हाती जाऊन, पिशवी उघडून खाईपर्यत तीन दिवसांच्या त्या पोळ्या वातड झाल्या आणि तो कारखाना बंद पडला. याच्या उलट डोंबिवलीला एका विधवा बाईनं डोंबिवली स्टेशनच्या बाहेर एक छोटीशी जागा घेऊन डब्यात ताज्या पोळ्या आणि ताजी भाजी घेऊन स्वतः उभी राहिली. लोकल गाडी पकडायला जे पुरुष जात, त्यांच्यापैकी ज्यांना कुणाला घरून काही कारणानं डबा आणता आला नसेल त्यानं तिथं यायचं आणि त्या बाईकडून दोन-तीन चपात्या आणि भाजी-चटणी-लोणचं घ्यायचं आणि पैसे द्यायचे. दररोज सकाळी ताजी भाजी. ताजी चपाती मिळू शकते हे पाहिल्यानंतर स्टेशनवर त्या जागी, त्या विधवा बाईने चालू केलेल्या कामाच्या तिथे चाळीस माणसं केवळ डबे भरण्यासाठी नोकरीला लागले आहेत. चुकीचं केंद्रीकरण केलं म्हणजे त्याचा पुण्याचा चपात्याचा कारखाना होतो. आपण उत्पादन करताना चुकीचं केंद्रीकरण केलं तर तसंच खड्डयात जाऊ. समजा आपल्याकडच्या एखाद्या गृहिणीला साबुदाणा वडे चांगले बनवता येतात. तर तिनं असं ठरवलं की भरपूर साबूदाणा वडे तयार करायचे, पिशव्यात भरायचे आणि चंदीगढला न्यायचे तर ते नाही जमणार; पण तिच्या साबूदाणा वड्याचा एक फार्म्युला आपण करू शकतो. बारकाईने सूचना देऊन - त्यात साबूदाणा किती असला पाहिजे, बटाटे किती असले पाहिजेत, दाणे किती असले पाहिजेत, मीठ किती प्रमाणात -त्याचप्रमाणे वडे बनविण्याच्या शक्यता वेगवेगळ्या ठिकाणी तयार

बळिचे राज्य येणार आहे / ४५