पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ज्या तऱ्हेचा जॅम खातो त्या तऱ्हेचा जॅम, तो ज्या तऱ्हेचा फळांचा रस आवडीने पितो त्या तऱ्हेचा रस बाटल्यांमध्ये भरलेला. युरोपीय लोकांच्या खाण्याच्या पद्धतीमध्ये जे काही पदार्थ बसतात ते पदार्थ आम्ही हिंदुस्थानामध्ये त्यांनी तयार केलेली यंत्र आणून किंवा त्या पद्धतीची यंत्रे करून ते पदार्थ त्यांना विकायचा प्रयत्न करतो हे शक्य नाही. त्यांच्यापेक्षा चांगलं जॅम तुम्ही बनविणे शक्य नाही. त्यांनी दिलेली यंत्रसामुग्री आणून तुम्ही 'शॅम्पेन' ची फॅक्टरी बनवलीत अगदी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणून बनवलीत, तरी तिकडे त्यापेक्षा अधिक आधुनिक यंत्रसामग्री तयार होत राहणार. मग तुमची फॅक्टरी जुनी होऊन जाणार. मग प्रश्न येतो की जगामध्ये सर्वात आधी अत्याधुनिक तंत्रज्ञान तुम्ही तयार कराल अशी ताकद आहे का? मुळीच नाही. उलट त्यांनी आणलेलं आणखी नवीन तंत्रज्ञान समजायचीसुद्धा ताकद नाही अशा पात्रतेचे आम्ही. म्हणजे आम्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत दिवसेंदिवस अधिक अडाणी होत जातो आहोत. प्रक्रियाशेती म्हणजे 'माजघर शेती'मध्ये याला वाव नाही.

 पदार्थ कसा तयार करायचा ? शॅम्पेन चांगली म्हणजे कशी असते? बटाट्याचा साधा एक चिप्, एक वेफर तयार करायचा तर तो चांगला कसा फुलतो चांगला कसा रंगतो, चवीने चांगला कसा होतो, याची जाणीव तयार करणाराला कशी झाली पाहिजे? हिंदुस्थानात एकच उदाहरण देण्यासारखं आहे. मोटारच्या गॅरेजमधला मिस्त्री या दृष्टीने आदरास अत्यंत पात्र असा माणूस आहे. त्याच्याकडे मूळचा पार्ट नसला तरी चालेल, 'उल्हासनगर'चा पार्ट नसला तरी चालेल; कोणतीही एखादी लोखंडाची नळी घेऊन एखादी पट्टी घेऊन, बांधून तुमची गाडी पाचपंधरा किलोमीटरपर्यंत चालेल एवढी तरी व्यवस्था तो करू शकतो. याचं कारण, मोटारीच्या इंजिनची आणि त्याची दोस्ती झालेली असते. ही दोस्ती बटाट्याचा वेफर बनवणाऱ्या गृहिणीची आणि त्या वेफरची होऊ शकते. 'अल्फा लाव्हाल'चं यंत्र आणून साखर तयार केली किंवा आईस्क्रीम तयार केलं किंवा शॅम्पेन तयार केली तर कारखानदाराची आणि त्या मालाची अशी दोस्ती होऊ शकत नाही आणि ही जिथं दोस्ती होत नाही तिथं प्रक्रियाही यशस्वी होऊ शकत नाही. माजघर शेती म्हणून प्रक्रिया करताना आम्ही काय विकणार आहोत ? जॅम बनवून नाही विकणार. तुम्ही फ्रेंच मनुष्य 'क्रेप' तयार करतो म्हणून त्याचे क्रेप तयार करून त्याला विकायला जाल तर तो म्हणेल याला काही जमलं नाही फारसं. ते शक्यही होणार नाही. आपल्याकडेही काही पदार्थ आहेत. ते पदार्थ तयार केल्यानंतर त्यांची खुमारी

बळिचे राज्य येणार आहे / ४४