पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/361

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करावा अशी! त्या तीन वर्षांत अजून किती हजार शेतकरी आत्महत्या करून जातील याची डॉक्टर साहेबांना फिकीर दिसली नाही.
 दौरा अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांचा
 विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच राहिल्या. सरकारी आकडेवारीप्रमाणेच यंदा झालेल्या आत्महत्यांचा आकडा ६००च्या वर गेला आणि मग दस्तूरखुद्द राज्यमान्य राजश्री पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगजी यांची विदर्भाची भेट जाहीर झाली. लगेच धावपळ सुरू झाली. दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्ष सोनियादेवी विदर्भात येऊन गेल्या होत्या. खास नेहरू-गांधी शैलीने त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची विचारपूस केल्याचे चित्रण सर्व वाहिन्यांनी प्रसारित केले होते. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती किती झाली त्याची शोधाशोध सुरू झाली आणि त्यातील एकही आश्वासन पुरे झाले नाही हे स्पष्ट झाले. सोनियादेवींची आश्वासने अशीच असतात. त्यांचा काही वैचारिक शुद्धतेबद्दल आणि नैतिक स्वच्छतेबद्दल फारसा बभ्रा नाही. अगदी कचाट्यात सापडल्या म्हणजे देवीजी मोठ्या शिताफीने त्यागाचे नाटक करून सटकतात, एवढीच त्यांची ख्याती.
 पण डॉ. मनमोहनसिंग यांची गोष्ट वेगळी. पं. नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर गांधी अर्थशास्त्राला उलथून टाकून समाजवादाच्या नावाखाली लायसेन्स-परमिट कोटा राज्य उभे केले. त्या समाजवादाच्या डोलाऱ्याला पहिला धक्का देणारा अर्थमंत्री म्हणून मनमोहनसिंगाची मान्यता. पंडित नेहरूंच्या तथाकथित तटस्थतावादी परराष्ट्र धोरणाच्या अगदी नेमके उलटे जाऊन अमेरिकेशी सन्मान्य शर्तीवर करार-मदार करण्याची कुशलता त्यांनी दाखवली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) २४ महिन्यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडी झाली, पण दुरान्वयानेही एकही शिंतोडा मनमोहनसिंगांच्या अंगाला चिकटला नाही. अभ्यासू अर्थतज्ज्ञ आणि स्वच्छ चारित्र्याचा प्रधानमंत्री ही त्यांची प्रतिमा. त्यामुळे डॉ. मनमोहनसिंग विदर्भाला भेट द्यायला येतात हे जाहीर झाल्यावर, साहजिकच विदर्भवासीयांच्या आशा पालवल्या.

 विदर्भाच्या हालअपेष्टांची पराकाष्ठा झाली ती जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात. पावसाने एक हुलकावणी दाखवून तोंड लपवले. सुदैवाने, फारच थोड्या शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे धाडस केले. कापूस पेरणीची वेळ टळत चाललेली आणि पावसाचे नाव म्हणून नाही. अशी ती भयानक वेळ होती. खरे म्हटले तर त्यावेळी डॉ. मनमोहनसिंग यांनी विदर्भाला भेट देऊन जनांना

बळिचे राज्य येणार आहे / ३६३