पान:बलसागर (Balsagar).pdf/90

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चालीरीती म्हणजेच हिंदू समाज, असे समीकरण मनात धरून हिंदू या शब्दाचा, हिंदुत्वाचा द्वेषही त्यांनी फैलावला. काँग्रेस सुरुवातीला या प्रवृत्तीच्या लोकांच्या ताब्यात होती. त्यामुळे राष्ट्रवाद म्हणजे हिंदुद्वेष, हे समीकरण घट्ट होत गेले. मुसलमानांनी तर हा शब्द टाकलाच; पण मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात, काँग्रेसच्या चळवळीत सामील व्हावे म्हणून काँग्रेसनेही हा शब्द टाकण्याची तयारी दाखवली. टिळक-काळात निदान हिंदू आणि हिंदी हे दोन्ही शब्द वापरात तरी होते. हिंंदी ऐक्यासाठी हिंदुत्वावर पाणी सोडायची टिळकांची भूमिका नव्हती; पण त्या दिशेने वाटचाल सुरू मात्र झालेली होती. गांधी-नेहरू काळात तर या वाटचालीला भलताच वेग आला, हिंदू शब्दाला सोडचिठ्ठीच दिली गेली ! काँग्रेसी राष्ट्रवाद आणि ब्रिटिशधार्जिणा समाजसुधारणावाद यांनी ‘हिंदू' शब्द उच्चारणे पापच ठरवून टाकले. हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात हिंंदूंंचाच तेजोभंग होऊ लागला. आजही तो सुरूच आहे !

 येत्या २० मार्चला (१९८२) पुण्याला भरणारी राष्ट्रीय एकात्मता परिषद म्हणजे याच पूर्वापार हिंदुविरोधाचा नवा अविष्कार आहे. गेल्याच महिन्यात विश्वहिंदू परिषदेतर्फे एक जनजागरणाचा कार्यक्रम झाला. त्याला उत्तर देण्यासाठी ही राष्ट्रीय एकात्मता परिषद योजली गेली, हे उघड आहे. विनोद म्हणजे, एके काळी संयुक्त महाराष्ट्रासाठी झटलेली, मुंबईवर मराठी जनतेचा हक्क सांगणारी मंडळीच या परिषदेच्या मुळाशी आहेत. मुंबईत अठरापगड जातींचे लोक राहतात. अनेक प्रांतांचे, धर्माचे लोक मुंबईत आहेत. अ-मराठी कामगार आहेत, तसे अ-मराठी भांडवलदारही मुंबईत आहेत. असे आहे तर मग मुंबई केवळ मराठी माणसाची कशी ठरते ? जे मुंबईत राहतात त्या सर्वांची मुंबई आहे, असे समजायला हवे; पण तसे समजले गेले नाही. मुंबईवर मराठी जनतेचा हक्क सांगितला गेला. तिच्यासाठी एकशे पाच हुतात्म्यांचे रक्तही सांडले गेले ! मुंबई महाराष्ट्राची, मराठी जनतेची आहे, असे म्हटल्यावर मुंबईतल्या पंजाब्यांना, दाक्षिणात्यांना काय वाटेल, याची चौकशी त्या वेळी या मंडळींनी केली होती का ? गुजराथी तर मुंबईशी एकरूप झालेले. त्यांचा हक्क जराही मान्य करण्यात आला नाही. का ? दशकानुदशके मुंबईत राहणा-यांच्या भावनाचा विचार न करता त्या वेळी मुंबईवर मराठी जनतेने हक्क सांगितला, प्रस्थापित केला, तो कशाच्या आधारावर ? 'बहुसंख्या' हाच प्रमुख निकष त्या वेळी आधार म्हणून मानला गेला. मुंबईत बहुसंख्य लोक मराठी आहेत यावरून मुंबई जर मराठी जनतेची ठरते, ठरली, तर त्याच न्यायाने, या देशात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून हा देश हिंदूचा आहे, हे हिंदूराष्ट्र आहे, असे

।। बलसागर ।। ८९