पान:बलसागर (Balsagar).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नोकरशाही, राजकीय पक्ष या सगळ्यांचाच वाटा होता. नवीन कायदेकानू केले, ओळखपत्रे वगैरे दिली तरी हीच नोकरशाही, हेच राजकीय पक्ष उद्याही आसामात राहणार आहेत. तेव्हा नवीन लोंढे येणारच नाहीत, जुने व्यवस्थितपणे हुडकले जाऊन बाहेर कटाक्षाने हाकलले जातीलच याची शाश्वती काय ? जर आसामची नैसर्गिक साधनसामग्री विपुल असेल, तेथे कारखानदारी वगैरे वाढणार असेल आणि राजवट उदार व लोकशाहीवादी असेल तर आसपासच्या कमी विकसित व लष्करी अंमलाखाली दडपल्या गेलेल्या भागातून, म्हणजे मुख्यतः बांगला देशातून, आसामच्या भूमीवर लोकसंख्येचे आक्रमण होतच राहणार, हे उघड आहे. लोकसंख्याशास्त्राचा हा अगदी प्राथमिक धडा आहे. आपण बेफिकीर राहिलो तरी शास्त्र बदलत नाही. मद्रासी माणूस मुंबईत येऊन मराठी लोकांवर स्वार होतो. केरळीय माणूस मध्यपूर्वेत जाऊन पैसाअडका कमावतो. तसेच बांगला देशीय उद्या विकसित आसाममध्ये येणार नाहीत, त्यांचे आसामी जीवनावर वर्चस्व निर्माण होणार नाही, अशी शाश्वती कुणीच देऊ शकणार नाही. म्हणून या सर्व विभागाचा एकात्म व समतोल विकास हा या प्रश्नावरील खरा, टिकावू उपाय आहे व त्यासाठी ४७ साली या विभागाची, धर्माच्या तत्वावर झालेली कृत्रिम फाळणी : प्रथम रद्द होणे आवश्यक आहे. बांगलादेशीय रहिवासी घुसताहेत म्हणून त्यांना परत पाठविण्याचा किचकट व उफराटा उपद्वयाप करण्यापेक्षा किंवा आसामियांनी अंग चोरून आपल्याचे प्रांतात परकीयांच्या दबावाखाली संकोचून जीवन कंठण्यापेक्षा, जिथून बंगलादेशीय निर्वासित येताहेत तो तो भाग, तेवढ्या तेवढ्या प्रमाणात आसाम-बंगालशी जोडून घेण्याची मागणी केली पाहिजे व त्या दृष्टीने आंदोलनेही संघटित करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. गेलेला विकासाचा तोल याशिवाय पूर्णपणे सावरला जाणार नाही व निर्वासितांचा प्रश्नही कायमचा सुटणार नाही. प्रत्याक्रमण हा आक्रमण थोपविण्याचा राजमार्ग असतो. हा पुढे जाणारा राजमार्ग चोखाळण्याऐवजी आसामची नाकेबंदी करण्याची उलट वाट धरली जात आहे. हे चूक आहे. आसामच्या आंदोलनाला संकुचित प्रतिवादी आंदोलन ठरविण्याचा डाव्या व विशेषतः बंगाली पत्रकारांचा दृष्टिकोनही चुकीचाच आहे. बंगलादेशीय नागरिक आसामात घूसतो आहे तर असामियांनी आणि बंगाल्यांनी बंगला देशात घुसण्यास काय हरकत आहे ? हा विचारसुद्धा आपल्याला सध्या सुचत नाही. याचे कारण गेल्या हजार वर्षांची आपली गुलामी. सततच्या पराभवामुळे काही मानसिक विकृती निर्माण होतात- चर्चिलने यांना Diseases of Defeat असे म्हटले आहे. गेल्या हजार वर्षांत विजयांपेक्षा पराभवांचे अनुभव आपल्याला जास्त आले. त्यामुळे आक्रमक उपाय योजनेचा नुसता विचारही आपल्याला भयंकर वाटतो.

।। बलसागर ।। ६७