पान:बलसागर (Balsagar).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारालाही अमानुष आणि रानटी वाटणाच्या पद्धतीने भारतीय स्त्रीची अब्रू दिवसाढवळ्या, श्रीनगरातील भरचौकात लुटली गेली होती, तरीही, साधी चौकशीची मागणी सादिकसाहेब धूडकावू शकत होते आणि दिल्लीलाही हस्तक्षेप करण्याची गरज भासत नव्हती, की हिंमतच होत नव्हती ?

 पंडितसमाजाची हिंमत मात्र या प्रसंगानंतर खचण्याऐवजी अधिकच वाढली. त्यांचा निश्चय अधिकच कणखर झाला. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. भारतात ठिकठिकाणी पसरलेल्या पंडित समाजाकडून आर्थिक मदतीची आश्वासने येऊ लागली. सहानुभूती व्यक्त करणाच्या तारांचा पाऊस पडू लागला, पुढील कार्यक्रमांबाबत सूचना व प्रत्यक्ष भाग घेण्याची तयारीही पत्रांतून कळवली जाऊ लागली. पाच हजारांच्या तुकडीने श्रीनगर ते दिल्ली चालत जाऊन लोकसभेचे द्वार ठोठावावे, काहींनी अग्निसमर्पण करून घ्यावे, प्राणांतिक उपोषणे करावीत, शंभर शंभर कुटुंबांनी काश्मिरातून कायमसाठी बाहेर पडावे असे अनेक कार्यक्रम कृती समितीपुढे या वेळी विचारासाठी होते, यावरून पंडित समाज किती प्रक्षुब्ध झाला होता, जिवावर उदार होऊन आंदोलन यशस्वी करण्याचा त्याचा निर्धार किती तीव्र होता याची काहीशी कल्पना येऊ शकते. चळवळीची रोजची हकीकत, प्रगती पत्रकातून जनतेसमोर ठेवण्यात येत होती. भूमिका पुनः पुन्हा स्पष्ट केली जात होती. सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या आरोपांचे खंडन केले जात होते.
 चळवळीचे लोण हळूहळू इतरत्रही पसरू लागले होते. जम्मूत गडबड सुरू झाली होती, शेजारच्या पंजाब-हरियाना भागातही अस्वस्थता वाढत होती. श्रीनगरातील व एकूण काश्मिरातील बहुसंख्य मुसलमान समाजानेही या आंदोलनाबाबत अद्यापपर्यंत स्पृहणीय अलिप्तता राखली होती. जरी या आंदोलनाला काश्मिरातील सर्वसाधारण मुसलमान समाजाचा पाठिंबा होता असे म्हणता येत नसले तरी, १५ ऑगस्टला जे घडले ते वाईट आहे, अशीच समजूतदार मुसलमान समाजाची तरी मनोमन भावना होती, असा निर्वाळा पंडित समाजातील अनेक कार्यकत्र्यांनी व तटस्थ निरीक्षकांनी मला दिला, हेही येथे नमूद करणे अवश्य आहे.

 मात्र हे वातावरण फार तर आणखी एक आठवडाभरच टिकणार होते. त्यानंतर आंदोलनाला एक नवेच जहरी वळण लागणार होते. नवाच जातीय पीळ भरला जाणार होता. अद्यापपावेतो आंदोलन चालू होते, दिवसेंदिवस तीव्रता वाढत होती, पोलिसांचे अत्याचार सुरू होते-एवढीच आंदोलनाची व्याप्ती होती पण आठवड्याभराने चित्र पालटणार होते. हजारो वर्षे गुण्यागोविंदाने शेजारी.

।। बलसागर ।। ३५