राहत असलेल्या हिंदूंच्या घरात मुसलमान गुंड घुसणार होते. जाळपोळी होणार होत्या, दंगली उफाळणार होत्या, लुटालूट होणार होती. आंदोलनाने हे जातीय वळण का घेतले ? याला जबाबदार कोण ? निमित्ताचा धनी कोण ठरला आणि खरी कारस्थाने कोणी रचली ?
हजरत बाल मशिदीतून पैगंबरांचा मानला गेलेला केस नाहीसा झाल्याच्या प्रसंगावरून काश्मिरमध्ये पाच-सहा वर्षांपूर्वी जी दंगलीची प्रचंड लाट उसळली तेव्हापासून आपली, राजकीय उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी दंगली घडवून आणण्याचे एक नवेच तंत्र महत्त्वाकांक्षी राजकारणी व्यक्तींच्या हाती गवसल्याने सारखे झाले. स्वाभाविक लोकक्षोभाचा उद्रेक वेगळा, जुनाट सामाजिक वैमनस्याचा स्फोट वेगळा आणि चार-आठ तासात काहीतरी अफवा पिकवून, खऱ्याचे खोट करून घडवून आणण्यात येणाऱ्या दंगली वेगळ्या. परमेश्वरीच्या निमित्ताने, पंधरा ऑगस्टला रीगल चौकात आपल्या आया-बहिणींच्या शीलाचे निघालेले धिंडवडे सहन न होऊन, सात्त्विक संतापाच्या तिरीमिरीने दिवसेंदिवस उग्र होत चाललेले पंडितांचे आंदोलन वेगळे आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जातीय दंगलींनी पेटलेले श्रीनगर वेगळे. श्रीनगरचे हे आत्ताचे पेटणे आणि हजरतबालच्या निमित्ताने तेव्हाचे पेटणे, याची जात एकच आहे-राजकीय प्रतिपक्ष बदनाम करणे, उखडून टाकणे, त्याच्या प्रतिष्ठेला धक्का देणे या राजकीय खेळात गार गरीब जनतेचा जीव गेला तरी पर्वा नाही. ती काय ! मकी बिचारी कुणीही, कशीही हाकावी ! फक्त हाकताना तोंडी भाषा जनताजनार्दनाची, लोकशाहीची ठेवली म्हणजे पुरे आहे. तेव्हा शमसुद्दीनसाहेबांचा बळी घेण्यासाठी बक्षीजी आतुर झाले होते, आता सादिकसाहेबांना उखडून टाकण्यासाठी कुण पीर गियासुद्दीन, कुणी मीर कासिम पुढे सरसावले. खेळ तोच, पात्रे नवीन. काश्मिरात तर या खेळाचे प्रयोग वारंवार होत असतात. निमित्त सापडण्याचाच काय तो अवकाश ! रॉकेलचे डबे, पलिते, दगड, सोडा वॉटरच्या बाटल्या आणि असंतष्ट जमाव (यालाच ' जनता ' असेही गोंडस नाव दिले जाते) ही सब सामग्री नेहमी तयारच असते. छुः म्हणायचे काय ते बाकी ! अनेक महत्त्वाकांक्षा राजकीय पुढाऱ्यांपाशी असा ज्याचा त्याचा फौजफाटा जमलेला असतो, त्याची व्यवस्थित जपणूक केलेली असते आणि वेळप्रसंगी आपल्या पोशिंद्या मालकांच्या उपयोगी पडून त्याचे काम साधून देणे, हे या फौजफाट्याचे कर्तव्यच ठरते. मध्यपूर्वेत अरबांचा पराभव झाला त्याचा, आणि काश्मिरचा काही संबंध आहे का? पण या कारणावरून श्रीनगरमध्ये प्रचंड दंगल उसळली होती याचा आपल्याला इकडे पत्ताच नाही. गेल्या सात जूनला जमाव जमला, मिरवणुका निघाल्या;