शकत नव्हता. असा समाजच आपल्या ऐहिक विकासाच्या आड येणारी जातीबंधने, धार्मिक रूढी इत्यादी भेदाभेदांची बंधने झुगारून, आपल्या प्रगतीची वाट मोकळी करून घेत असतो. केवळ अंगच्या कर्तृत्वावर व प्रयत्नांच्या बळावर पुढे येण्याची इर्षा बाळगू शकतो. 'गुण' हीच एकमेव कसोटी मानून आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनाची नवी घडी बसविण्याचा धीटपणा प्रकट करीत असतो. राष्ट्रवाद हे अशा स्वयंप्रज्ञ, गतिशील अशा नव्या मध्यमवर्गाचे तत्त्वज्ञान आहे व जोपर्यंत असा वर्ग सामाजिक जीवनात प्रभावी होत नाही, तोपर्यंत निर्भेळ राष्ट्रवादाचा अविष्कारही अपूर्ण व खंडितच राहत असतो. सावरकर जेव्हा हिंदुराष्ट्रवादाचा विचार मांडीत होते, तेव्हा तो ग्रहण करणारा असा गतिमान नवा मध्यम वर्गच देशात, मोठ्या प्रमाणावर, उदयास आलेला नव्हता; पारतंत्र्यामुळे तो येऊच शकत नव्हता. येथे होता तो परकीय नोकरशाहीने पोसलेला कमकुवत पांढरपेशा सुशिक्षित समाज-जो विचाराने जरी सावरकरांच्या मागे जाणारा असला तरी कोणतीही लढाऊ कृती करण्यास असमर्थ होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास आपल्या राष्ट्रीय क्रांतीतील हा कमकुवतपणा स्पष्ट झाला. देशाची फाळणी कोणीही टाळू शकले नाही. गांधी-नेहरू काय किंवा सावरकर-सुभाष काय, कोणालाच फाळणी मनापासून नको होती. मुसलमानांची अरेरावी व अराष्ट्रीय वृत्ती समजत होती. पण फाळणीचे संकट टाळायचे तर, या अरेरावी अल्पसंख्याकांनी फेकलेले अराजकाचे, रक्तपाताचे, जातीय व धार्मिक दंगलीचे आव्हान स्वीकारून, या अराष्ट्रीय प्रवृत्तीशी समोरासमोर झुंज देण्याइतका येथील 'राष्ट्रीय' समाज प्रगल्भ व प्रखर असायला हवा. गांधी-नेहरू ब्रिटिशांच्या दडपणांना बळी पडले, लीगच्या अराजकाच्या व रक्तपाताच्या धमकावण्यांपुढे त्यांनी गुढगे टेकले, हे खरेच. पण हेही खरे नव्हे का की, सर्व हिंदुत्वनिष्ठ संस्थाही फाळणी घडून येत असता स्वस्थ राहिल्या ? सशस्त्र, निःशस्त्र, अहिंसक-कोणत्याही मार्गाने फाळणीविरुद्ध प्रतिकाराचे आंदोलन उभारणे यांना को अशक्य वाटले ? लढाऊ विचार असला, तरी लढाऊ कृती करणारा 'राष्ट्रीय' समाज या संघटनांच्या मागे तेव्हा नव्हता, हेच या अक्रियेच कारण असू शकते. लिकन जेव्हा दक्षिण अमेरिकेचे बंडाचे, यादवी युद्धाचे आव्हान स्वीकारतो, तेव्हा त्याच्यामागे उद्योगप्रधान उत्तर अमेरिकेचा प्रगत मध्यम वर्ग उभा असतो. आमच्याकडे हा वर्ग नव्हता, असा कृतिशील समाज नव्हता; त्यामुळे लिकन असूनही त्याला शेवटी नमावे लागले. हिंदुराष्ट्रवाद तात्त्विकदृष्ट्या अचूक असूनही व्यवहारतः अपयशी ठरला. हिदी राष्ट्रवाद तर अस्तित्वातच नव्हता, त्यामुळे त्याचा विचार करण्याचेच कारण नाही.
गेल्या १७ वर्षात, स्वतंत्र भारतात औद्योगीकरणामुळे हा नवा प्रगत मध्यमसमाज उदयास येत आहे. सावरकरांच्या व्यावहारिक यशाची व मान्यतेची ही पायाभरणीच सुरू आहे. सावरकरपर्व आता दूर नाही, कारण समर्थ भारत आता सर्वांचेच