पान:बलसागर (Balsagar).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साध्य झालेले आहे. ३८ च्या सावरकरांनी दोन घोषणा दिल्या. राजनीतीचे हिंदुकरण आणि हिंदूचे सैनिकीकरण. पैकी उत्तरार्ध देशाने मान्य केला. शासनाने सैनिकीकरणाचा अवलंब केला. अगदी साधनशुचिताप्रिय समाजवाद्यांनीही त्याचा पुरस्कार मांडला. ३८ चे सावरकर मान्य नसणाऱ्या या पोक्त आणि पुरोगामी मंडळींची काय ही दैना ! नुकत्याच घडलेल्या भारत-पाक संघर्षात भारतीय फौजा लाहोरमध्ये घुसविण्यात आल्या नाहीत, याबद्दल या मंडळींनी भारत सरकारवर कठोर टीका केली आहे! चीनने आणखी आगळीक केल्यास, तिबेटमध्ये सैन्य घुसवा, असाही यांचा भारत सरकारला सल्ला आहे ! पाकिस्तानच नष्ट केले पाहिजे असाही या मंडळींचा नवा पवित्रा आहे. काळाने इतक्या लवकर आपला सूड उगवावा ! ६८ साल उजाडण्यापूर्वीच सावरकरांनी यांची अशी दांडी उडवलेली पाहून मोठी मौज वाटते, करमणूक होते. राहता राहिले सावरकरांचे हिंदुत्व. देश जसजसा स्वावलंबनाच्या दृष्टीने प्रगती करू लागेल, या भूमीच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाला जसजसा आकार व आशय प्राप्त होऊ लागेल, तसतसा येथील जनमानसाच्या मुळाशी असणारा हिंदुत्वाचा मूळ संस्कारच प्रबळ होईल; किंबहुना या संस्काराची बीजभूमी घट्ट पकडल्याशिवाय या देशाचे स्वत्व जागेच होऊ शकणार नाही, स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता या केवळ घोषणाच राहतील. हाच हिंदुत्वाचा वन्ही चेतवावा, हेच बीज फुलवावे, अशी धारणा वाढत जाईल. मग भले त्याला कोणी 'भारतीय' हे नाव देवो किंवा 'हिंदी' या नावाने ओळखो. या नावांच्या आत दडले असेल-कधी सुप्तावस्थेत तर कधी प्रकट-ते सावरकरांचे 'हिंदुत्व'च असेल. शंका आहे सावरकरांचा बुद्धिवाद, सावरकरांची विज्ञाननिष्ठा, येथे कितपत रुजेल याची. सावरकरांचे निर्भय पुरोगामित्व, विज्ञानाधिष्ठित बुद्धिवाद येथे रुजला नाही तर त्यांचे सैनिकीकरण, त्यांचे हिंदुत्व, येथील सनातनी प्रतिगाम्यांच्या कोठडीत बंदिस्त होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून सावरकरांचा हा बुद्धिवादी वारसा, त्यांची सामाजिक समतेची आणि स्वातंत्र्याची आकांक्षा येथे प्रज्वलित राहण्याची नितांत आवश्यकता आहे. बाकीचे सर्व सावरकर मान्य होतील, तोफांच्या चौघड्यांनी त्यांच्या शताब्द्या भावी पिढ्या साजऱ्या करतील-कदाचित त्यांना प्राणाहून प्रिय असणाऱ्या त्या सुरसरिता सिंधूच्या विस्तीर्ण तीरावरही हे घडून येईल. पण तेव्हा विजयाच्या त्या अत्युत्कट क्षणी, आमच्या एका हातातील धगधगत्या अग्निगोलकांबरोबरच आमच्या दुसऱ्या हातात सामाजिक समतेसाठी निर्भयतेने झुंजणारी सावरकरी बुद्धिवादाची तळपती असिलता चमकत असेल काय ? ती तशी त्या वेळी असेल तर सावरकरांचे जीवन सर्वार्थाने धन्य झाले, कृतार्थ झाले असेच म्हणावे लागेल.

मार्च १९६६

।। बलसागर ।। २७