पान:बलसागर (Balsagar).pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रचंड बहुसंख्या आहे, अहिंदु धर्म आणि विशेषतः मुसलमान, हे राष्ट्रीय झगडा चालू असताना कोठेच आढळत नाहीत नि झगड्याची फळे तोडण्याच्या वेळी मात्र नेमके आघाडीस असलेले आढळतात, आणि आपण एकटेच आजवर सर्व लढा लढत नि त्यातले आघात सोशीत आलो आहोत; या सर्व गोष्टींची जाणीव असूनसुद्धा ते एकीकडे ठेवून, हिंदू हे सर्वांचे संयुक्त हिंदी राष्ट्र बनविण्यास समुत्सुक आहेत, आणि आपले कोणतेही राखून ठेवलेले असे स्वतंत्र हक्क, वा सत्ता, वा अधिकार हिंदुस्थानातील अहिंदुवर्गावर मुळीच लादू इच्छीत नाहीत.
 "पण ते हिंदी राज्य मात्र निर्भेळ हिंदीच असू द्या. त्या राज्याने मताधिकार, नोकऱ्या, अधिकाराची स्थाने, कर यांच्या संबंधात धर्माच्या व जातीच्या तत्त्वावर कसल्याही मत्सरोत्तेजक भेदाभेदांना मुळीच थारा देऊ नये. कोणताही मनुष्य हिंदू आहे की, मुसलमान आहे की, खिस्ती आहे की, ज्यू आहे, इकडे लक्ष दिले जाऊ नये. या हिंदी राज्यातील सर्व नागरिक, सर्वसामान्य लोकसंख्येतील त्यांची धार्मिक किंवा जातीय शेकडेवारी विचारात घेतली न जाता, त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक गुणावगुणांनुसार वागविले जाऊ द्या. इंग्लंड किंवा अमेरिकेतील संयुक्त संस्थाने यांसारख्या जगातील इतर प्रत्येक राष्ट्रात असल्याप्रमाणे, देशातील प्रचंड वहुसंख्य लोकांना समजत असेल तीच भाषा नि तीच लिपी, त्या हिंदी राज्याची राष्ट्रीय भाषा नि राष्ट्रीय लिपी होऊ द्या......कोणतीही जाती किंवा पंथ, वंश किंवा धर्म विचारात न घेता ‘एक मनुष्य एक मत' असा सर्वसामान्य नियम होऊ द्या. अशा स्वरूपाचे हिंदी राज्य जर दृष्टीपुढे धरावयाचे असेल तर हिंदुसंघटनावादी, स्वतः हिंदुसंघटनांच्याच हितार्थ, त्या राज्याला अंतःकरणपूर्वक पहिल्याने आपली निष्टा अर्पितील."

 यावरून स्वच्छ दिसते की, ध्येय म्हणून हिंदी राष्ट्रवाद सावरकरांना केव्हाच अमान्य नव्हता; परंतु वस्तुस्थितीकडे डोळेझाक होऊ नये, हा त्यांचा आग्रह होता. काँग्रेसप्रणित हिंदी राष्ट्रवाद अनुनयापोटी, भीतीपोटी जन्मास आला आहे, ही सावरकरांची टीका होती. त्यांना हिंदी राष्ट्रवादाची स्वाभाविक परिणती अभिप्रेत होती. पण परिणतावस्थेला पोहोचलेला हिंदी राष्ट्रवाद तर सोडाच, स्वाभाविक व सहजस्वरूप हिंदुराष्ट्रवादही त्या काळात बहुसंख्य जनतेला मानवणारा नव्हता. असे का असावे ? कुठल्याही मत्सरोत्तेजक भेदाभेदांना थारा न देणारा, व्यक्तीचे गुण हीच एकमेव कसोटी मानणारा, राष्ट्रवादाच्या मुळाशी असणारा आधुनिक ऐहिकनिष्ठ हिंदुसमाजच त्या काळी भारतात विकसित झालेला नव्हता. हिंदुस्थान हा शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांची वसाहत बनलेला देश होता. म्हणजेच येथील स्वतंत्र आथिक कर्तृत्व मारले गेले होते. स्वतंत्र कारखानदारी येथे वाढू शकत नव्हती. स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे आलेला स्वतंत्र बाण्याचा औद्योगिक समाज येथे अस्तित्वात येऊ

।। बलसागर ।। २५