स्वातंत्र्यप्रीती मान्य असणे, याला तसा काहीच अर्थ नाही. अग्नीची उष्णता, सुवर्णाची कांती मान्य करण्यासारखेच हे प्राथमिक आणि अनावश्यक आहे. या उष्णतेची अधिक चिकित्सा हवी. धातूची पुढची परीक्षा हवी. सावरकरांनी देशस्वातंत्र्यासाठी जो सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरला, त्याची इष्टानिष्टता, योग्यायोग्यता व यशापयश निश्चित करणे हा खरा 'मान्यते'चा अर्थ आहे.
क्रांतिपक्ष व लोकपक्ष
याबाबत सावरकरांचा सशस्त्र क्रांतिपक्ष आणि गांधीजींचा अहिंसापक्ष या दोन्ही विरोधी पक्षांच्या आग्रही व एकांतिक भूमिका इतिहासाला मान्य होण्यासारख्या नाहीत. भारताला अहिंसेनेही स्वराज्य मिळालेले नाही आणि सशस्त्र युद्धात ब्रिटनचा पराभव झाल्यामुळे भारत स्वतंत्र झाला, हेही प्रतिपादन बरोबर नाही. सशस्त्र आणि नि:शस्त्र या दोन्ही मार्गांनी प्रथमपासून भारताचा स्वातंत्र्यलढा सुरू होता व महायुद्धामुळे खिळखिळया झालेल्या ब्रिटनला, आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या दडपणाखाली, भारताला स्वातंत्र्य देऊन निघून जावे लागले, असे एकूण आपल्या स्वातंत्र्ययुद्धाचे स्थूल चित्र आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास काँग्रेस हा एकमेव संघटित लोकपक्ष देशात अस्तित्वात असल्याने स्वराज्याचे प्रत्यक्ष माप या पक्षाच्या पदरात पडणे स्वाभाविकच होते. यश कोणी हस्तगत केले, हा प्रश्न नाही. संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढले कोण ? सत्ता गेली कोणाकडे ? असे नेहमीच घडत असते. जो हजीर तोच वजीर ठरत असतो. तेव्हा सशस्त्र क्रांतिपक्षाच्या वाट्याला वजिरी आली नाही, हा काही या पक्षाच्या 'चुकी'च्या मार्गाचा पुरावा नाही. शेवटी यश हे संधीवर योग्य वेळी झडप टाकल्याने मिळत असते. प्रयत्नाशी त्याचे नाते असले, तरी ते गणिताइतके सरळ व अनिवार्य नसते. क्रांतिपक्षाच्या पराक्रमामुळे व प्रयत्नामुळे स्वराज्य जवळ आले, पण हा पक्ष संघटित नसल्याने, त्याला लोकमताचा फारसा पाठिंबा नसल्याने, अंतिम वाटाघाटीत या पक्षाला स्थान मिळविता आले नाही. क्रांतिपक्ष आणि लोकपक्ष यांची टिळकांनंतर भारतीय राजकारणात झालेली पूर्ण फारकत याला कारणीभूत आहे. केवळ लोकपक्ष-जनतेचा केवळ नि:शस्त्र प्रतिकारी पक्षकितीही संघटित आणि बहुसंख्य असला, तरी केवळ आपल्या बळावर कधीही स्वातंत्र्ययुद्धाचा शेवट करू शकत नाही. अशा लोकपक्षाच्या सामर्थ्यावर व त्याने लढविलेल्या निःशस्त्र-अहिंसक लढ्यावरच केवळ गांधीजींची श्रद्धा; तर दुसऱ्या टोकाला सावरकर-भगतसिंगादि क्रांतिकारकांचा 'निर्धारी अल्पसंख्ये'च्या पराक्रमावरच केवळ विश्वास ! सावरकरांनी हा 'अल्पसंख्ये'चा सिद्धांत या