पान:बलसागर (Balsagar).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सावरकर पर्व

 सावरकर गेले. सावरकर-पर्व सुरू झाले आहे.
 एक जुना प्रसंग आठवतो. रत्नागिरीहून सावरकर सुटलेले होते. १९३७-३८ चा सुमार असावा. समाजवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी सावरकर-सत्काराचा एक कार्यक्रम योजला होता. प्रास्ताविक भाषण करताना सभेच्या संयोजकांनी सांगितले की, 'हा सत्कार १९०८ सालच्या सावरकरांचा आहे. ब्रिटिशांशी झुंजणारे १९०८ चे सावरकर आम्हाला मान्य आहेत. हल्लीचे, १९३८ चे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते सावरकर आम्हाला मान्य होण्यासारखे नाहीत ...'
 आणि केतकीच्या वनातून सळकन बाहेर येणाऱ्या पिवळ्याधमक नागाने फणा काढावा, तसे विषयाच्या ओघात, सत्काराला उत्तर देताना सावरकर चमकून म्हणाले, '१९०८ साली सावरकर जे कार्य करीत होते, ते त्या वेळीही कोणाला मान्य होत नव्हते. 'माथेफिरू' म्हणूनच त्या वेळीही त्यांची गणना होत असे. आज आपल्याला १९०८ च्या सावरकरांना मान्यता द्यावीशी वाटते. ठीक आहे. १९०८ चे सावरकर मान्य व्हायला, १९३८ साल उजाडावे लागले ! १९३८ चे सावरकर मान्य व्हायला, कदाचित १९६८ साल उजाडेल ! कोणी सांगावे ! मी आज जे सांगतो त्याची सत्यता १९६८ साली कदाचित आपल्याला पटेलही...'

 ६८ साल अद्याप दूर आहे. ३८ चे सावरकर काय होते आणि ते मान्य होणे याचा अर्थ काय होतो, हे नंतर पाहूच. पण १९०८ च्या सावरकरांना मान्यता देणे, याचा तरी नेमका अर्थ काय आहे ? सावरकरांची प्रखर देशभक्ती व

।। बलसागर ।। १९