शब्दात मांडला आहे. ते लिहितात, "प्रत्येक देशास पारतंत्र्यातून सोडवून स्वतंत्र करण्याचे कार्य अंती तेथील निर्धारी व वीर्यशाली अशा यथाप्रमाण अल्पसंख्येलाच करावे लागते." (समग्र सावरकर वाङ्मय, खंड ३, पृ. ६०). या दोन्ही भूमिका अर्थातच एकांतिक आहेत. निर्धारी अल्पसंख्य ही आघाडीची, हल्ला करणारी तुकडी मानली, तरी मुख्य सैन्याने पाठोपाठ चाल ही केलीच पाहिजे. क्रांतिपक्षाला लोकमताचे पाठबळ नसले, संघटित लोकपक्षाची एक भूमिगत शाखा म्हणून क्रांतिपक्ष वावरत नसला, तर योगायोगाने स्वातंत्र्य लाभले तरी ते अस्थिरच राहते. वरचेवर राज्यक्रांत्या, उठाव आणि लष्करी बंडांचे घातचक्र देशात सुरू होते आणि क्रांतिपक्षाचे उग्र आंदोलन लोकपक्षाच्या पाठीशी नसले तर लोकपक्ष हा अखेरीस मवाळांचा मेळावा ठरून शत्रूवर योग्य तेवढे दडपण आणण्यास असमर्थ ठरतो. ही जोड जमवावीच लागते. ती जमल्याशिवाय कार्यसिद्धी होऊ शकत नाही. टिळकांजवळ ही समन्वयाची दृष्टी होती. वेळप्रसंग पाहून सर्व मार्ग हाताळण्याची चतुरस्रता होती. एकीकडे ते स्वच्छ म्हणत,
"कोणतीही चळवळ लोकांच्या अनुकूलतेखेरीज सिद्धीस जात नाही. लोक अनुकूल नसल्यास एकटा पुढारी फशी पडतो." तर दुसरीकडे क्रांतिकारकांना पाठीशी घालण्याचे, खाडिलकरांना नेपाळात पाठवून बाँबच्या कारखान्याच्या दृष्टीने काही हालचाल करण्याचे, सैनिकीकरणाचा जोरदार पुरस्कार करण्याचे त्यांचे उद्योगही चालूच असत. मवाळांचे वाटाघाटींचे मार्गही त्यांनी कधी वर्ज्य मानले नाहीत, तसेच वेळप्रसंगी लोकांची तशी ५० टक्के जरी तयारी दिसली, तर सशस्त्र बंडाचा पर्यायही नजरेआड केला नाही. शक्याशक्यतेचा विचार मात्र कधी सोडला नाही. 'साधनानामनेकता' हे नित्याचे सूत्र ; आणि अशी सर्व साधने कालमानाप्रमाणे वापरून स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेत असता, अगदी शेवटी ब्रिटन एखाद्या संकटात सापडून ब्रिटिश साम्राज्यालाच जेव्हा बाहेरून धक्के बसतील, तेव्हाच या सर्व अंतर्गत चळवळींना यश मिळण्याची शक्यता आहे, हेही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे त्यांचे भान कधी सुटले नाही. कुठलीच एकांतिकता त्यांच्या स्वभावात नव्हती. व्यवहाराची मांड अगदी पक्की होती. टिळकांनंतर आपल्या स्वातंत्र्ययुद्धाची अशी व्यापक हाताळणी झालीच नाही. सशस्त्र आणि नि:शस्त्र वेगवेगळे लढले. त्यामुळे अखेरच्या क्षणी दोन्हीकडे कमजोरी दिसली, शत्रूचे फावले. पण फारकत पडली, यश एकाच पक्षाकडे गेले म्हणून क्रांतिपक्षाचा मार्ग ‘चुकी' चा ठरत नाही, 'अनावश्यक' ठरत नाही. भारत हा ब्रिटिशांनी नि:शस्त्र करून सोडलेला देश असल्याने येथे सशस्त्र क्रांतिमागला वावच उरला नव्हता, हे प्रतिपादन टिकू शकत नाही. सावरकरांची सैनिकीकरणाची मोहीम, सुभाषचंद्रांची आझाद हिंद