Jump to content

पान:बलसागर (Balsagar).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांनी आग्रहच धरला म्हणून मग शास्त्रीसरकारला भराभर पुढे पावले टाकावी लागली. अन्यथा काश्मिरचा कारभार आटोपलाच होता.'
 आता शास्त्रीजींना महाराजा करणसिंगांनी जागे केले का सादिकसाहेबांनी केले हा वादाचा मुद्दा सोडला, तरी एक गोष्ट यावरून सरळ ध्यानात येते की, काश्मिरचा कारभार आटोपण्याच्या पंथाला लागण्याइतका पाकिस्तानी आक्रमणाचा डाव मोठा होता व या डावाची आम्हाला शेवटपर्यंत कल्पना नव्हती. पाकिस्तानी हल्लेखोर काश्मिरात सर्वत्र घुसलेले होते-थेट श्रीनगर विमानतळापर्यंत त्यांचा प्रवेश होता. त्यांची संख्या दहा हजारांच्या आसपास असावी. त्यांचेजवळ पाकिस्तानी शस्त्रास्त्रे होती. आत घुसविलेल्या या सशस्त्र हल्लेखोरांनी उठावणी सुरू करताच बाहेरून छांबकडून प्रचंड सैन्यानिशी चाल करून काश्मिर एका सपाट्यात मुक्त करण्याचा पाकिस्तानची साहसी डाव होता. हा डाव आम्ही वेळीच सावध झाल्याने उधळला गेला हे जरी खरे असले, तरी त्यामुळेच आमच्या उपाययोजनेला तात्कालिक संकटनिवारणाचे स्वरूप येणेही अपरिहार्य होते. लाहोर आघाडी आपण उघडली नसती, तर छांबवरची पाकिस्तानी मगरमिठी सुटत नव्हती. काही जाणकारांचे तर असे मत आहे की, फक्त ४८ तासच आम्ही उशीर केला असता, तर काश्मिरचा मामला खतम होता आणि पंजाबही काही सुरक्षित राहिला नसता. तेव्हा 'तात्कालिक संकट निवारण' हेच आमच्या चढाईचे मुख्य उद्दिष्ट असावे, व ते साध्य झाल्यावर आम्ही युद्धविराम पत्करून स्वस्थ बसलो. 'पाकिस्तानचे सैनिकीबळ खच्ची करणे,' ‘आक्रमणाचा कायमचा बंदोबस्त करणे,'- वगैरे कारणे मागाहून लोकांच्या समाधानासाठी पुढे केली गेली असावीत. काश्मिर वाचवण अगदी निकडीचेच होते, ते साधले, एवढेच या पहिल्या युद्धपर्वाचे फलित. बाकी पाकिस्तान आहे तिथेच आहे, आणि आपणही होतो तिथेच आहोत. किंचितसा बदल-किंचितशी जागृती-बस्स.

डिसेंबर १९६५

।। बलसागर ।। १८