Jump to content

पान:बलसागर (Balsagar).pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ळ्याच्या लंबकाप्रमाणे मानवी समाज या दोन टोकांमध्ये हेलकावत असतो असेही दाखवून देता येईल. भारतापुरते बोलायचे तर जडवादाचे प्राबल्य असणारा कालखंड तुलनेने थोडा आहे व चैतन्यवादाने जडवादावर येथे नेहमीच विजय मिळविलेला आहे. या इतिहासक्रमाशी दीनदयाळांचा एकात्म मानवविचार जुळलेला आहे. अधिक काळपर्यंत एखादी विचारपद्धती, एखादे तत्त्वज्ञान, त्यातून निर्माण होणारी जीवनशैली एखाद्या देशावर प्रभाव गाजवीत राहिली तर ती त्या देशाचे वैशिष्ट्य, वेगळेपणाची खूण मानायला हरकत नाही. तसे चैतन्यवादाबाबत म्हणता येईल. जगातल्या सर्व देशात, सर्व काळात हा वाद जरी अस्तित्वात असला, त्याचे पुरस्कर्ते निर्माण झालेले असले तरी भारतातच या वादाची पाळेमुळे खूप खोलवर गेलेली आहेत, येथील जीवनावर या वादाची दाट छाया पसरून राहिलेली आहे व वेदकाळापासून विवेकानंदांपर्यंत आणि गीतेपासून गांधीजींपर्यंत हा चैतन्यस्रोत अखंडपणे वाहात आलेला आहे. या प्रवाहाचेच 'एकात्म मानववाद' हे दीनदयाळकृत एक नवे संस्करण आहे, नवे नामकरण आहे. प्रवाह प्राचीन आहे, सनातन आहे. त्यातला आशय या दोन शब्दात दीनदयाळांनी नेमका अंकित केला आहे. आपले 'भारतीयत्व' कशात आहे ? ‘एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति' या जीवनदृष्टीत ते सामावलेले आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या मूळ अस्तित्वाचा, भारतीयत्वाचा शोध घेतला त्यांनी त्यांनी हे सत्य सांगितले. दीनदयाळ हेच सत्य चालू संदर्भात, विशेषतः सामाजिक आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून पुन्हा नव्याने सांगत आहेत.

 परिस्थितीचे पुनः पुन्हा विश्लेषण करून, नवीन संदर्भात कुठलेही तत्त्वज्ञान असे मांडले गेले नाही तर ते जीर्ण होते, नष्टही होते. आपल्याकडे विश्लेषणाचे, कालानुरूप तत्त्वज्ञानाची नव्याने मांडणी करण्याचे प्रयत्न अव्याहत होत राहिलेले आहेत. विवेकानंद ज्या काळात वावरले तेव्हा मिल्ल-स्पेन्सर यांच्या विचारांचा भारतावर पगडा होता, ख्रिश्चन धर्म प्रचार जोरात सुरू होता. हे वैचारिक व आध्यात्मिक आक्रमण परतवून लावता येईल अशीच आपल्या विचारांची, तत्त्वज्ञानाची मांडणी विवेकानंदांनी केलेली आपल्याला दिसेल. त्यांनी मिल्ल-स्पेन्सरवाद्यांचे तार्किक हल्ले आध्यात्मिक प्रभावाने निष्प्रभ केले व ख्रिस्ताचे सेवातत्त्व हिंदुधर्मात अंतर्भूत करून घेतले. दीनदयाळांचा कालखंड हा भांडवलशाही-समाजवाद या विचारांचा कालखंड. त्यामुळे या विचारांच्या संदर्भात त्यांनी एकात्म हिंदू परंपरेचे विश्लेषण व नवे संस्करण करायला प्रवृत्त होणे साहजिकच होते. त्यांच्या एकात्म मानववादाची उभारणी या दोन विचारसरणींनी उभी केलेली आव्हाने डोळ्यांसमोर ठेवून झालेली

।। बलसागर ।। १६४