आपल्याला दिसेल. भांडवलशाही व समाजवाद या दोन्ही विचारसरणीत एक समान दोष त्यांना आढळला. या विचारसरणीत माणसाच्या फक्त एकाच अंगावर फाजील भर दिला गेलेला आहे. भांडवलशाहीत माणूस फक्त आर्थिक प्राणी मानला गेला तर समाजवादात त्याला राजकीय प्राणी ठरविण्यात आले. तसाच दुसराही एक अतिरेक या दोन्ही विचारसरणीत आहे. भांडवलशाहीत व्यक्ती या घटकाला अवास्तव महत्त्व देण्यात आलेले आहे तर समाजवादात व्यक्तिजीवन सामाजिकतेत -राजकारणात पूर्णपणे विलीन होण्याचा धोका दडलेला आहे. आर्थिक-राजकीय अंगांना अवास्तव महत्त्व व व्यक्ती किंवा समाज यापैकी एका घटकाचे प्रभुत्व ही मनुष्याच्या विकासाला मारक ठरणारी दोन टोके आहेत. दीनदयाळांच्या एकात्म मानववादात या दोन टोकांचे भान विशेष बाळगले गेलेले आहे. मनुष्यपणाची अशी तोडमोड, ओढाताण, फाळणी न व्हावी यासाठी त्यांनी हिंदुधर्मातील चतुर्विध पुरुषार्थाची कल्पना पुन्हा उचलून धरली, नव्या संदर्भात तिची वेगळी मांडणी केली. माणूस म्हणजे केवळ आर्थिक-राजकीय प्राणी नाही, तो समाजाचा गुलाम नाही, तसेच समाजाला आपल्या स्वार्थासाठी केव्हाही, कसाही वेठीस धरणारा शोषक नाही. व्यक्तीविकास आणि समाजस्वास्थ्य यांचा एक विशिष्ट मेळ घालणे हे नियोजनाचे, समाजरचनेचे मुख्य प्रतिपादन आहे व भांडवलशाहीचा अस्त व समाजवादाविषयीचा सार्वत्रिक भ्रमनिरास या सद्य:स्थितीच्या संदर्भात हे प्रतिपादन विचारात घेण्याची फार गरजही आहे.
☐
भांडवलशाही-समाजवाद या पश्चिमेकडून आलेल्या विचारसरणीतली आणखीही एक उणीव दीनदयाळांनी दाखवून दिलेली आहे. भाकरीचा प्रश्न, राजकीय जीवन प्रधान मानता मानता या विचारसरणी अखेर माणसाचे उच्च असे आध्यात्मिक जीवनच नाकारतात, ते संपुष्टातही आणतात. भाकरीइतकीच माणसाला आध्यात्मिक सुखाचीही गोडी आहे, हे सत्य, ही तत्त्वज्ञाने या विचारसणी ध्यानातच घेत नाहीत. धर्म किवा अध्यात्म म्हणजे पिळवणूक करणाऱ्या वर्गाने आपले वर्चस्व टिकवून धरण्यासाठी उभी केलेली थोतांडे आहेत असा दृष्टिकोन बाळगल्यानंतर माणसाच्या उच्च आध्यात्मिक सुखाची अशी वाताहत उडण्यावाचून दुसरे काही घडूच शकत नाही. दीनदयाळ ज्या हिंदुपरंपरेत वाढले, त्या परंपरेला मनुष्यजीवनाची अशी वाताहत मंजूर नाही. भाकरी आणि अध्यात्म या परंपरेने अभिन्न मानले व ऐहिक आणि पारलौकिकाचा मेळ साधणारी व्यक्तिजीवनाची व समाजव्यवस्थेची मांडणी आदर्श ठरवली. माणसाच्या सर्व गरजा, वासना, प्रेरणा, नैसर्गिक प्रवृत्ती विचारात घ्यायच्या,