पान:बलसागर (Balsagar).pdf/162

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 एकात्म मानव

 

 पंडित नेहरूंनी भारताचा शोध घेतला पण 'भारतीयत्व' कशात आहे हे त्यांनी आपल्या ग्रंथात नि:संदिग्धरीत्या कुठेही सांगितलेले नाही. पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी हा भारतीयत्वाचा शोध घेण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. इतकेच नाही तर या भारतीयत्वाच्या आदेशाप्रमाणे ते प्रत्यक्षात जगले-वागलेही. त्यांच्या दृष्टीने कशात आहे हे भारतीयत्व ? अनेकत्वात एकत्व पाहण्याची, अनुभवण्याची जीवनदृष्टी म्हणजे भारतीय जीवनदृष्टी असे त्यांचे गृहीत होते व या गृहीतावरच त्यांचा एकात्म मानववाद हा उभा आहे.

 परंतु येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, एकात्म मानववादाची उभारणी भौतिक किंवा जडवादी दृष्टिकोनातूनही होऊ शकते. मार्क्सचे मानवदर्शन अशा जडवादावर आधारित आहे. उलट दीनदयाळ उपाध्याय हे भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे वारसदार असल्याने चैतन्यवाद ही त्यांच्या एकात्मतेची मूळ धारणा आहे. हा जड-चैतन्यवाद तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात हजारो वर्षे चालत आलेला आहे व तो यापुढेही चालत राहणार आहे. सृष्टीच्या मुळाशी जडतत्त्व आहे की, चैतन्याच्या स्फुरणातून सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, हे तत्त्वज्ञांना आजवर कधीही न सुटलेले कोडे आहे व शेवटी यापैकी कुठला तरी एक पक्ष श्रद्धेने किंवा संस्काराने स्वीकारून मानवी जीवनाविषयी, समाजधारणेविषयी विचार मांडावा लागतो. इतिहासात जडवादाचे प्राबल्य असणारे कालखंड आहेत तशीच चैतन्यवादाने भारलेली शतकेच्या शतकेही आहेत. घड्या-

।। बलसागर ।। १६३