पान:बलसागर (Balsagar).pdf/161

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वातंत्र्याला सामर्थ्याची जोडही द्यावी लागते. तिसऱ्या जगतात भारतापेक्षा चीनचा आवाज आज अधिक ताकतवान आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. क्रीडाक्षेत्रापासून अणुविज्ञानापर्यंत चीन आज आपल्या पुढे आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री शुल्टझ भारतात येऊन दादागिरी करून जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय कर्ज काढल्याशिवाय आपल्याला मागील कर्जावरचे व्याजही भागवता येत नाही. चीन असा परावलंबी व कर्जबाजारी नाही. दुष्काळ, महापूर चीनमध्ये आजही आहेत. भ्रष्टाचार, कामचुकारपणा कम्युनिस्ट राजवट आली की संपतो असेही नाही ; पण चीनचे अग्रक्रम आपल्यापेक्षा अधिक पायाशुद्ध होते. चीनने प्रथम खेडीपाडी सुधारली, लोकांना काम दिले, संरक्षण स्थिती मजबूत केली आणि मागाहून जागतिक शांततेची कबुतरे उडवली. सावरकरांचे, गांधीजींचे थोडे तरी, वेळच्या वेळी ऐकले असते, त्याप्रमाणे धोरणे आखून ती अंमलात आणली असती तर १९६२ मधली चीनकडून झालेली फजिती टाळता आली असती. पराभव समजू शकतो. माघार-चढाई हेही प्रकार युद्धात चालतात. पण रस्ते नाहीत, सैन्याला गरजेच्या वस्तुचा पुरवठा नाही, गाफीलपणा, हा चुकीच्या तत्त्वज्ञानाचा, दुबळया राजनीतीचाच परिणाम होता. नेहरूंनी गांधींचेही ऐकले नाही आणि सावरकरांना तर ते मानतच नव्हते ! संरक्षणाकडे दुर्लक्ष आणि स्वावलंबी, स्वयंपूर्णतेकडे नेणाऱ्या नियोजनाचाही अभाव. असा नेहरूवाद चीनने दिलेल्या एकाच धक्क्याने कोसळला ! या धक्क्यातून नेहरू शेवटपर्यंत वर आले नाहीत. पंचशील आणि जागतिक शांतता हवी; पण पराभूतांच्या तोंडी हे शांतिमंत्र शोभून दिसत नाहीत. नेहरूंमुळे लोकशाही जिवंत राहिली ; पण पराभववादालाच एक विकृत प्रतिष्ठाही मिळत राहिली. या पराभववादातून आपले हे राष्ट्र प्रथम वर यायला हवे. ही मानसिक किंवा सांस्कृतिक क्रांती येथे प्रथम घडून यायला हवी. याशिवाय शेतकऱ्यांचे दारिद्रय असो, राष्ट्रीय एकात्मता असो किंवा नियोजन असो, आपले कुठलेच प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. हा देश आपला आहे, तो वैभवाकडे नेण्याची जबाबदारी आपली आहे असे मानणाऱ्या सर्वांची भक्कम एकजूट आणि लोकांना काम मिळेल असे पायाशुद्ध नियोजन, ही आजची गरज आहे. द्वेषभावना न वाढवता ही गरज पुरी करता येणे शक्य आहे. खोटा-भाबडा आशावाद आणि फाजील निराशावाद दोन्ही टोके यासाठी सोडली पाहिजेत. 'सामर्थ्य आहे चळवळीचे ।जो जो करील तयाचे ।।' हा रामदासी पुरुषार्थमंत्र अशा काळासाठीच आहे. अवतारांची वाट पाहत बसण्यात काय अर्थ आहे ?

ऑगस्ट १९८३

।। बलसागर ।। १६२