पान:बलसागर (Balsagar).pdf/160

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे मत चुकीचे ठरवून दाखविले. विखुरलेल्या शेतकरी समाजालाच त्याने मोठ्या प्रमाणात संघटित करून चीनमध्ये क्रांती घडवून आणली. शेतकऱ्यांच्या ठिकाणी स्वाभाविक असलेल्या दो बिघा जमिनीच्या प्रेमाचे त्याने पितृभूप्रेमात विकसन केले आणि वर्गविग्रहाचाही कौशल्याने उपयोग करून घेतला. स्वदेशप्रीती आणि समता या दोन्ही भावनांचा मेळ घातल्यामुळे माओला यश मिळाले. एडगर स्नो हा माओ-चीनवर लिहिणारा अलीकडचा पहिला महत्त्वाचा लेखक. माओचे हे वैशिष्ट्य त्यानेही हेरले होते.त्या अगोदर चीनमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी तिसऱ्या इंटरनॅशनलतर्फे गेलेले मानवेंद्रनाथ रॉय यांनाही माओ हा राष्ट्रवादी नेता आहे, असेच प्रकर्षाने जाणवलेले होते. आणखी एक चीन अभ्यासक, लिओनेल मॅक्स चॅसिन, आपल्या 'द कम्युनिस्ट काँक्वेस्ट ऑफ चायना' या ग्रंथात लिहितो-Mao cleverly appealed to the insticts of social justice and propritorship which are so strong in the human heart. Mao knew how to make his soldiers dedicated workers for a powerful China, a respected China where justice, truth and peace would reign.' (China Readings, II p.297) म्हणजे समर्थ चीनचे, जगात मान असलेल्या देशाचे, शांतता आणि न्याय यांची शाश्वती असलेल्या नवसमाजाचे स्वप्न माओने चीनी शेतकऱ्यांसमोर ठेवले, त्याच्या स्वार्थालाही खतपाणी घातले आणि त्याला नवचीन उभारणीचा ध्येयवादही शिकवला. 'जगातील कामगारांनो–एक व्हा' या मार्क्सवादी स्वप्नापेक्षा हा स्वप्नवाद वेगळा आहे. राष्ट्रवाद येथे नाकारला गेलेला नाही उलट राष्ट्रीय प्रेरणेचा आधार घेतला गेलेला आहे. असा आधार नसता तर शेतकरी आणि कामगारच नाही तर लहान कारखानदार, मध्यमवर्ग या सर्व घटकांना एकत्र करण्यात माओला जे यश लाभले ते लाभलेच नसते. चँक-के-शेखची भ्रष्टाचारी राजवट हे जसे माओविजयाचे एक कारण होते, तसेच हे व्यापक राष्ट्रीय ऐक्यही, ही सर्व वर्गाची एकजूटही महत्त्वाची ठरली.

 हे ऐक्य, ही एकजूट आपल्याकडे पहिल्यापासूनच नाही. फुले आणि टिळक एकत्र आले नाहीत. सावरकर आणि आंबेडकर यांचे जमले नाही. कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय प्रवाहापासून दूर राहिला आणि राष्ट्रीय प्रवाहाला सामाजिक आर्थिक समतेचे महत्त्व जाणवले नाही. विनोबांनी एकदम 'जय जगत' म्हटले व नक्षलवाद्यांनी 'माओ आमचा चेअरमन' अशी चक्क राष्ट्रद्रोही घोषणा केली. साम्राज्यवादविरोधी लढा आणि समानताशील विकासतंत्र यांची माओने योग्य ती सांगड घातली, म्हणून आपल्यापेक्षा माओला अधिक भरीव यश प्राप्त करून घेता आले. आपण लोकशाही स्वातंत्र्याची बूज अधिक राखली हे खरे आहे; पण

॥ बलसागर ।। १६१