पान:बलसागर (Balsagar).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मलपृष्ठावर ठळकपणे शरद जोशींचे पुढील विधान छापण्यात आलेले आहे. शरद जोशी म्हणतात -

 "शेतकऱ्यांचे शोषण न होता जलद आर्थिक विकास होऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी हा लढा आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या आसुडाविषयी जे सांगितले त्यामध्ये व आज मी जे काही सांगतोय त्यामध्ये काहीही फरक नाही फक्त फुल्यांच्यानंतर हा विचार प्रथमच पुढे येत आहे आणि मी तो अर्थशास्त्रीय परिभाषेत मांडतो आहे.

 एक ऐतिहासिक महत्त्वाचा लढा आपण लढतो आहोत. यामधून जगाच्या आर्थिक जडण-घडणीला नवी दिशा मिळणार आहे."

 म. फुले यांची शिकवण राज्यकर्त्यांनी नेहमी डोळ्यांसमोर ठेवावी, त्यांच्यापासून स्फूर्ती व प्रेरणा घ्यावी म्हणून मुंबईच्या नव्या विधानभवनासमोर म. फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यानंतरचे, आपले महाराष्ट्रातील राज्यकर्ते तरी बहुसंख्येने शेतकरीसमाजातून पुढे आलेले आहेत. तरी शेतकरी समाज मात्र फुल्यांच्या काळात होता त्यापेक्षा अधिक उध्वस्त व कर्जबाजारी झालेला आहे.

 शरद जोशींची शेतकरी-चळवळही सध्या पूर्ण थंडावलेली आहे.

 शेतकऱ्यांच्या एकाही चळवळीला, बंडाला आजवर आपल्याकडे पूर्णपणे यश का आले नाही ?

 तिकडे चीनमध्ये शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारा माओ यशस्वी ठरतो. शेतक-यांची दैन्यावस्थेतून, कर्जबाजारीपणातून मुक्तता करतो. इकडे विनोबांची भूदान चळवळ अल्पयशी, नक्षलवादी पराभूत, शरद जोशी–रुद्राप्पा-चरणसिंग या शेतकरी नेत्यांची पिछेहाट, असे का ?

 एक काळ माओच्या अतिगौरवाचा होता. सध्या माओचे अवमूलन सुरू आहे. ही दोन्ही टोके सोडली तरी माओने ग्रामीण चीनचा कायापालट घडवून आणला, शेतकऱ्यांचे दैन्य घालविले, चीनला कर्जबाजारीपणातून मुक्त केले, याबाबत शंका घ्यायला जागा नाही. मराठीत पंधरा-वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले आर. के. पाटील यांचे चीनवरचे पुस्तक पहा किंवा अगदी अलीकडचे नारगोळकरांचे. या दोन्ही व्यक्ती चीनमध्ये प्रत्यक्ष जाऊन आलेल्या. सर्वोदयी विचाराच्या. यांनी माओ -क्रांतीचे यश आणि अपयश दोन्ही बाजू दाखवलेल्या आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच सुधारली आहे असे

।। बलसागर ।। १५७