पान:बलसागर (Balsagar).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांनी मनमोकळेपणाने मान्य केलेले आहे. कुसुम नारगोळकरांच्या पुस्तकाला सर्वोदये विचारवंत श्री. दादा धर्माधिकारी यांची प्रस्तावना आहे. दादांनी लिहिले आहे, "चीनच्या शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे क्रांति पूर्व काळातील अत्यंत खडतर आणि हलाखीचे जीवन आणि क्रांतीनंतरचे त्यांचे त्यामानाने किती तरी सुखाचे जीवन यांच्यातील तफावत अंत:करणाला स्पर्श करते. चीनमध्येही क्वचित आळशी व कामचुकार लोक असतील; पण बेकारी, उपासमार व भीक यांचा मागमूसही नाही ही गोष्ट साम्यवादी क्रांतीची जमेची बाजू आहे. तिची वास्तविकता व महत्त्व ही कुठल्याही सहृदय माणसाला मुग्ध करण्यासारखी आहे." ('आम्ही पाहिलेला चीन,' कुसुम नारगोळकर, पृष्ठ ६ )

 अशी माहिती अलीकडे येत आहे की, माओनंतरचे राज्यकर्ते माओने स्थापन केलेल्या कम्युनपद्धतीत हळूहळू बदल करीत आहेत. खासगी शेतीला मर्यादित प्रमाणात प्रोत्साहन देण्याची त्यांची दृष्टी आहे. जेथे खाजगी मालकी व्यवस्था पूर्वीपासूनच आहे त्या तैवानमध्ये किंवा युद्धोत्तर दक्षिण कोरियामध्ये शेतीशेतकऱ्यांची प्रगती खूपच आहे. त्यामानाने माओचा किंवा माओ-नंतरचा चीन मागेच आहे, हे खरे आहे. पण भारतापेक्षा चीन पुढे आहे, तेथील ग्रामीण-शहरी जीवनाचा आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक स्तर आपल्यापेक्षा उंचावलेला आहे, यात शंका नाही. अजून भारत खतांची आयात करतो आहे, परक्या देशांवर अगदी प्राथमिक गरजांसाठीही आपण अद्याप अवलंबून आहोत. चीनमध्येही ग्रामीण भाग सोडून शहरात गर्दी करण्याची प्रवृत्ती आहे; पण आपल्यासारख्या झोपडपट्टया, भिकाऱ्यांच्या रांगा तेथे नाहीत. नुकतेच आपल्याकडील प्रकाशकांचे एक शिष्टमंडळ चीनला भेट देऊन आले. या शिष्टमंडळाचे एक सदस्य कृष्णा कृपलानी (दिल्ली) यांनी चीनमध्ये त्यांना सहज जे दृष्टोत्पत्तीस आले ते एका पत्रद्वारे प्रसिद्ध केलेले आहे. मुळ पत्र 'टाइम्स ऑफ इंडिया' ( १२ जुलै १९८३ ) या अंकात आलेले आहे. त्याचे हे पुण्याच्या "श्रमिक विचार' या दैनिकाचा २० जुलै अंकातील भाषांतर -

कृपलानींची साक्ष

 : नुकतीच मी चीनला भेट देऊन आलो. भारतातील प्रकाशकांचे एक शिष्टमंडळ भारत सरकारतर्फे चीनला पाठविण्यात आले होते, त्यात माझाही समावेश होता. चिनी सरकारतर्फे अशा शिष्टमंडळाला निमंत्रण दिले गेले होते. पंधरा दिवसांच्या आमच्या दौऱ्यात आम्ही बीजिंग, चेंग डू, शांघाय आणि कॅन्टन या शहरांना भेटी दिल्या. चिन्यांचे आदरातिथ्य भरपूर होते; परंतु कुठेही भपका नव्हता. चिनी लोक मला अत्यंत मैत्रीपूर्ण वाटले, तसेच

।। बलसागर ।। १५८