पान:बलसागर (Balsagar).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जमायलाच हवे. त्यांचा क्रांतीचा वारसा पुढे न्यायचा तर न भांडणारा, एकदिलाने चालणारा, कार्यक्रमाची नेटाने अंमलबजावणी करणारा, गणनेतृत्वांधिष्ठित जनता पक्ष ही किमान गरज आहे. मुख्य भार अर्थातच ग्रामीण भागात राहून, सत्तासंपत्ती याकडे पाठ फिरवून, दारिद्रयरेषेखाली जीवन कंठणाऱ्या जनसमुदायांचे संघटन आणि संवर्धन करणाऱ्या तरुणांनी वाहायचा आहे. संपूर्ण क्रांतीचा रथ अशी तरुण मंडळीच पुढे नेला तर नेऊ शकणार आहेत. जयप्रकाशांची सारी आशा या तरुणवर्गावरच केन्द्रित झालेली होती. केवळ सत्ताबदल, पक्षबदल किंवा वर्गबदल म्हणजे क्रांती असे त्यांनी मानले नव्हते. या प्रचलित मार्क्सवादी-समाजवादी भ्रमातून ते फार पूर्वीच मुक्त झालेले होते. त्यांची संपूर्ण क्रांतीची कल्पना मार्क्सवाद आणि सर्वोदय या दोन्हीचा समन्वय साधण्याचा एक प्रयत्न होता. हा प्रयत्न यशस्वी ठरायचा तर सत्तेपेक्षा सेवा, राजकारणापेक्षा समाजकारण अधिक महत्त्वाची मानणारी तरुण मंडळी मोठ्या संख्येने पुढे यायला हवीत. रा. स्व. संघ आणि जयप्रकाश यांच्यातील समान दुवा हाच होता. सत्ताधारी परिवर्तनावर शिक्कामोर्तब करू शकतात, परिवर्तनाचे प्रवाह सुरू करू शकत नाहीत. त्यासाठी लोकांबरोबर, लोकांसाठी झिजणारे सेवाव्रतधारी तरुण–प्रौढच अधिक उपयुक्त आहेत, असा गांधीजींचा विनोबांचा विचार जयप्रकाश पुढे नेत होते व आज नाही उद्या या विचाराला संघासारख्या संस्थांकडून मान्यता लाभण्याची, त्यानुसार व्यापक प्रमाणावर कृती घडण्याची खूपच शक्यता निर्माण झालेली होती. ही परिवर्तनाची खास भारतीय शैली आहे व कालानुरूप जे. पी. तिला नवे रूप देत होते, संघाचीही याला साथ मिळणे अवघड नव्हते. शेवटी हिंदुत्व काय किंवा भारतीयत्व काय, शब्दांच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. असे पाहिले गेले असते तर जनता पक्ष फुटला नसता आणि जे. पीं.नाही आपले विचार अंमलात आणणारी तरुण मंडळी जागोजाग पाहण्याचे भाग्य लाभले असते. उद्या असा भाग्योदय होणार नाही असे नाही. पण एक संधी हुकली एवढे खरे. पुन्हा केव्हा असा मणिकांचन योग जमून येतो ते पाहायचे. तो लवकर येवो.

ऑक्टोबर १९७९

।। बलसागर ।। १५१