पान:बलसागर (Balsagar).pdf/149

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पायबंद कसा घालायचा ? येथील लोकशाहीचा प्रयोग फसण्याचा धोका आहे. हा कसा टाळायचा ? हे खरे या दशकातले आपले मूलभूत प्रश्न आहेत व शब्दांचे घोळ घालत बसून ते सुटणार नाहीत हे उघड आहे. या मूलभूत प्रश्नांना जनता पक्ष हे बरेचसे समाधानकारक उत्तर सापडले होते; पण दुर्दैवाने या पक्षाची नौका शाब्दिक मतभेदांच्या खडकावरच आपटुन फुटली. उद्दिष्टांबाबत कुठलेही वाद निर्माण झालेले नव्हते; पण शब्दांचे बागुलबुवे उभे केले गेले आणि अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दात सांगायचे म्हणजे 'एक स्वप्न अर्ध्यावरच तुटून गेले.' मृच्छकटिकातल्या चारुदत्तासारखी जनता पक्षनेत्यांची अवस्था झाली. 'न भीतो मरणादस्मि' -चारुदत्त आपल्या मित्राला म्हणतो- 'केवलं दूषितं यशः' | 'मित्रा, भय मरणाचे नाही. यशाला काळीमा लागला हे दुःख आहे-' जनता पक्षाचे निदान काही नेते तरी मनातल्या मनात असेच म्हणत असतील. यांचे दु:खे केवळ सत्ता गेल्याचे नाही; ७७ चे उज्ज्वल यश, त्यावेळी डोळ्यांसमोर तरळलेली संपूर्ण क्रांतीची स्वप्ने धुळीला मिळाली ही खरी यांची व्यथा आहे. क्रांतीच्या मार्गाबाबत मतभेद झाले असते, तत्त्वासाठी फाटाफूट झाली असती तर फिकीर नव्हती. पण काहींची व्यक्तिगत सत्ताकांक्षा आणि नैतिक-बौद्धिक अहंमन्यता यामुळे पक्ष फुटावा, सत्ता जावी, क्रांतीचा प्रवास अर्धवटच रहावा, हे खरे या नेतेमंडळींचे दु:ख आहे. आणि हे सर्व या क्रांतीच्या जन्मदात्याच्या डोळ्यांसमोरच घडावे ! तो मृत्युशय्येवर असताना त्याला आपली बाग उजाड झाल्याचे पाहावे लागावे, हा तर केवढा दैवदुर्विलास आहे ? खरं तर त्याला जनता पक्ष बांधणीच्या कितीतरी पुढे जायचे होते. हे केवळ सुरुवातीचे हत्यार होते. पण तेही आज मोडून पडले आहे. ते पुन्हा जोडले गेले, जन्मदात्याची स्वप्ने आणि जनता पक्षाची संघटना यांचा मेळ पुन्हा जमून आला तर कुठल्याही शब्दात मावणार नाही, एव्हढी सुखसमृद्धी येथे नांदू शकणार आहे. इतकी साधनसामग्री, मनुष्यबळ, बुद्धिबळ येथे आजही उपलब्ध आहे की, कोणतीही असामान्य व्यक्ती-शक्ती न अवतरताही येथे आवश्यक ते परिवर्तन घडू शकते, संपूर्ण क्रांतीचे स्वप्न साकार होऊ शकते. गरीब भारत बलसागर भारत म्हणून विश्वात शोभून दिसू शकतो. जे. पी. गेले असतील. पण त्यांचा वारसा टिकवून धरला जाऊ शकतो. असामान्य नेतृत्वाची उणीव गणनेतृत्वाने भरून काढता येण्यासारखी आहे. संभाजीचा वध झाल्यावर मराठेशाही कशी तरली ? तसे हे जनता पक्षातले संताजी-धनाजी आपापले मतभेद-स्वार्थ विसरून काही काळ तरी वावरू शकतात की नाही ? यासाठी थोडा विवेक हवा. दूरदृष्टी हवी. पूर्वग्रह बाजूला ठेवण्यासाठी आवश्यक तो विचारांचा, वृत्तीचा मोकळेपणाही हवा. एवढ्याने सर्व कार्यभाग आटोपतो असे नव्हे. पण जयप्रकाशांचे कुंकू लावायचे तर किमान एवढे तरी

।। बलसागर ।। १५०