Jump to content

पान:बलसागर (Balsagar).pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नमाज - प्रकरणावर संघापुरता पडदा पडला होता; पण तिकडील वृत्तपत्रात व परस्पर बोलण्यात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत राहिल्या. काहींच्या मते जमातेवाल्यांनी संघाची परीक्षा पाहण्यासाठी मुद्दामच हे नमाजाचे नाटक केले. नाहीतर कोण लेकाचा दिवसातून पाच वेळा, अगदी ठरलेल्या वेळी, अलीकडच्या काळात नमाज पढत असतो ? काहींच्या मते जमाते ही सनातनी मुस्लिमांची संघटना असल्याने त्यांनी नमाजाची वेळ पाळणे स्वभाविकच होते. महत्त्वाचा मुद्दा जमातेवाल्यांचा हेतू काय होता हा नसून संघवाल्यांनी या घटनेचा स्वीकार कसा सहजतेने केला हा आहे. पन्नास वर्षे जी संघटना मुस्लिमविरोधासाठी बदनाम केली जात होती तिच्यात हा बदल पचवण्याची, सहजपणे आत्मसात करण्याची एकाएकी ताकद आली कुठून ? देवरसांचा आदेश आला आणि खालपासून मंडळी एका रात्रीत बदलली असे झाले नाही. होणे शक्यही नव्हते. वर्षभर देवरस कार्यकर्त्यांशी, सहकाऱ्यांशी यासंबंधी बोलले - चालले असले पाहिजेत. कुणाची समजूत घातली गेली असेल तर कुणाचा विरोध कठोरपणे मोडून काढला गेला असणेही शक्य आहे. दिल्लीतीत काही कार्यकर्ते सांगत होते, एका बैठकीत फार खडाजंगी झाली. संघ सत्तेच्या मागे लागू पाहतो आहे व त्यासाठी मुस्लिम - प्रवेशाचे हे खूळ संघाला आवश्यक वाटते, अशी टीका काही जुन्या मंडळींनी केली. मुस्लिम राजकारणाचे बदलते संदर्भ सांगून त्यांची समजूत संघ - श्रेष्ठींना घालावी लागली. एवढ्या प्रचंड व देशव्यापी संघटनेचा कारभार राजा बोले आणि दळ हाले या ठोकबाज पद्धतीने चालतो अशी समजूत करून घेणे भाबडेपणाचे किंवा मूर्खपणाचे लक्षण आहे. अंतर्गत लोकशाही ही संघाची कार्यपद्धती आहे व निदान हेडगेवार व देवरस यांच्या कारकीर्दीत तर या पद्धतीचा अवलंब सहजपणे झालेला आहे. गोळवलकरगुरुजी यांचे व्यक्तिमत्त्व काहीसे गूढ व आध्यात्मिक असल्याने कदाचित् अंतर्गत लोकशाहीचा दैनंदिन प्रत्यय येत असेल - नसेल. जवळचे लोकच याबाबत खरी वस्तुस्थिती सांगू शकतील; पण हेडगेवार - देवरस ही समान धाटणीची व्यक्तिमत्त्वे आहेत व या व्यक्तिमत्त्वांशी लोकशाही वृत्तीप्रवृत्ती मुळीच विसंगत नसतात. उलट सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा एक विलक्षण हातोटी अशा आत्मविलोपी व्यक्तिमत्त्वांजवळ असते. अशा आत्मविलोपाशिवाय का एवढ्या प्रचंड संघटना उभ्या राहतात ?

 अहमदाबादच्या याच भेटीत श्री. देशमुखांनी मला संघाच्या 'अराजनैतिक मंच' या एका नव्या उपक्रमाची थोडी माहिती दिली. अ. भा. स्तरावर या मंचाचे काम सुरू आहे. प्रत्येक प्रांतात यासाठी एका स्वतंत्र कार्यकर्त्याची योजना संघाने केलेली आहे. राजकीय क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील, सर्व धर्मातील, सर्व जातींतील विधायक कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना एकत्र आणणे हे

।। बलसागर ।। १३७