Jump to content

पान:बलसागर (Balsagar).pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या मंचाचे उद्दिष्ट आहे. हरिजनांविषयी अर्थातच श्री. देशमुख यांना मी विशेष खोदून विचारले. तेव्हा त्यांनी समग्र गोळवलकर वाङमयातील -बहुधा तो सातवा खंड असावा- या प्रश्नासंबंधी गांधीजी व गुरुजी यांच्यात झालेली एक महत्त्वपूर्ण चर्चा मला काढून दाखवली. मी ती तिथेच वाचली. या चर्चेत, गांधीजींच्या 'हरिजन' शब्दयोजनेबद्दलच गुरुजींनी सूक्ष्म मतभिन्नता नोंदविली असून, अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे एकात्मता निर्माण न होता, हरिजनांचा एक छोटा व वेगळा गटच समाजात तयार होईल व परस्परातील अंतर वाढत राहील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. संघाचा दृष्टिकोन गांधीजींनीही नीट समजावून घेतलेला दिसतो; पण कोणीही कुणाला चूक किंवा संकुचित ठरवलेले नाही. गांधीजींच्या सत्यशोधनप्रवृत्तीबद्दल तर गुरुजींनी अतीव आदरभाव व्यक्त केला आहे आणि हे स्वाभाविकच होते; कारण दोघेही हिंदुधर्माभिमानी होते व 'सत्याचा शोध' हे तर या धर्माचे प्राणतत्त्व. 'जीवनम् सत्यशोधनम्' या श्लोकार्धात हे विनोबांनीही नेमके व्यक्त केले आहे. ही असली अवतीभवतीची वैचारिक चर्चा मी देशमुखांशी करीत होतो व हरिजनांसाठी, ते कुणी खास वेगळे आहेत असे समजून काम करणे हे संघपद्धतीत कसे बसत नाही, हे देशमुख मला सांगत होते. अराजनैतिक मंचाचे विशेष लक्ष मागासलेल्या विभागांकडे-प्रदेशांकडे राहील हेही त्यांनी स्पष्ट केले; पण मंचाचा मुख्य उद्देश देशातील सर्व बिगरराजकीय विधायक शक्ती जागृत करणे, संघटित करणे असा सध्या तरी असल्याचे मला त्यांच्या सांगण्यावरून जाणवले.

 उद्या ही शक्ती खरोखरच जागृत व संघटित झाली, संघाने ती करून दाखवली तर जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीचेच नव्हे तर भारतीय समाजवादाचे एक नवीनच पर्व या देशात सुरू होणे अशक्य नाही. समाजवाद या नावात बिचकण्यासारखे, विरोध करण्यासारखे काही नाही, त्यातील अन्त्योदयाचा आशय संघाला मान्य आहे हे देवरसांनी 'इलस्ट्रेटेड विकली' ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलेलेच आहे. (मार्च १२-१८, १९७८ अंक) परंतु समाजवाद या नावाने आज जी रचना प्रचलित आहे ती राज्यवादी आहे, हा राज्यवाद संघाला अमान्य आहे. याच वस्तुस्थितीचा बोध झाल्याने जयप्रकाशांनीही पूर्वी समाजवादी पक्ष सोडला व एकूण पक्षीय राजनीतीलाही रामराम ठोकला ! सोव्हिएट रशिया किंवा चीन हे साम्यवादी देश असोत की भांडवलशाही युरोप-अमेरिका असो; दोन्हीकडे राज्यसंस्थेने संपूर्ण समाज व व्यक्तिजीवनाचा कोंडमारा चालवलेला आहे. मध्ययुगात जसे धर्माचे व पुरोहित-पोपवर्गाचे समाजजीवनावर सर्वंकष वर्चस्व होते, तसे वर्चस्व सध्याच्या काळात राजकीय पक्ष व नोकरशाही

।। बलसागर ।। १३८