विषयावर अनेकांनी 'झोत' टाकले असते. मुस्लिमविरोध हा संघाचा स्थायीभाव मानला गेलेला आहे. मुस्लिमांना प्रवेश नाही म्हणून संघाला जातीय - संकुचित ठरवण्याचा या देशात गेली पन्नास वर्षे अव्याहत प्रयत्न सुरू आहे. हा अडथळा - अडचण आता दूर झाली. मनमोकळेपणे या कृतीचे स्वागत व्हायला मग काय हरकत होती ? पण नाही. एकही पत्रक नाही. सभा नाही. उठसूट पत्रके आणि मोर्चे काढणाऱ्या तथाकथित डाव्यांच्या मनोवृत्तीवर 'झोत' टाकणारी ही घटना आहे आणि म्हणूनच अशांच्या टीकेला, जळफळाटाला संघाने आजवर केराची टोपली दाखवली तर त्यात संघाची तरी काय चूक आहे ?
☐
अहमदाबाद येथे संघकार्यालयात झालेली एक अनौपचारिक चर्चा आठवते. अहमदाबाद येथील हेडगेवार भवनात जमाते इस्लामच्या काही कार्यकर्त्यांनी नमाज पढला, अशी बातमी वृत्तपत्रात आली होती. या घटनेबाबत अधिक माहिती मिळवावी म्हणून मी अहमदाबादला, इतर कामासाठी गेलो असता, मुद्दाम तेथील संघ प्रमुखांची भेट घेतली. नानाजी देशमुख यांचे सख्खे भाऊच गुजरातचे संघप्रमुख आहेत. नमाज-घटना ही साखळीतील एक लहानसा दुवा आहे, असे यासंबंधी त्यांच्याशी बोलताना माझ्या ध्यानात आले. त्यांना स्वत:ला तर ही घटना अगदीच सहज घडून आलेली व मामुली वाटत होती. वृत्तपत्रांनी ती उगाच फुलवली - फुगवली. अशा फुलवण्या - फुगवण्याने अशा नाजूक कामात अडथळाच उत्पन्न होतो, असा त्यांनी वर अभिप्रायही व्यक्त केला. संघ - कार्यकर्ते व जमाते इस्लामीचे लोक आणीबाणी - काळात तुरुंगात एकत्र होते. जेलमधून सुटल्यावरही संबंध कायम राहिले, अधिक जोपासण्याचे उभयपक्षी प्रयत्न झाले. आणीबाणीनंतरच्या दौऱ्यात देवरस अहमदाबाद येथे गेले असता जमाते इस्लामीच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. तेथील कार्यकर्त्यांशी थोडा वेळ चर्चाही केली. या प्रसंगी गुजराथ जमाते इस्लामीचे प्रमुख श्री. हबीबुर रहेमान यांनी कुराणाची प्रतही त्यांना नजर केली. यानंतर जमाते इस्लामीचे अ. भा. प्रमुख अहमदाबादला आले तेव्हा त्यांचाही संघकार्यालय -भेटीचा कार्यक्रम योजण्यात आला. ही भेट चर्चास्वरूपाची होती व चांगली तीन - चार तास चर्चा रंगली. (१२ जून १९७७) चर्चेच्या दरम्यान जमाते मंडळींची नमाज पढण्याची वेळ झाली. नमाजाला जागा कुठची ? मशिदीत जाऊन पुन्हा परत यायचे म्हणजे वेळ लागणार. म्हणून या मंडळींनी इच्छा प्रदर्शित केल्यावरून त्यांची नमाज पढण्याची तिथेच एका वेगळ्या दालनात व्यवस्था करण्यात आली. या मध्यंतरानंतर चर्चा पुन्हा सुरू झाली. पद्य वगैरे संघपद्धतीने चर्चेची सुरुवात व शेवटही झाला. कार्यक्रम अटोपल्यावर या