असा निष्ठेच्या कार्यकर्त्यांचा एक संच ही संघाची ताकद आहे-सर्वोदय वगैरे संघटना किंवा बहुतेक राजकीय पक्ष यांच्यामध्ये नेमके हेच दिसत नाही. अशावेळी मजबूत संघटना ही एक शक्ती आहे हे खरेच, पण नुसती संघटना असून पुढे काय ? आज देशापुढे जे प्रश्न आहेत, समाजाचे मुळापासून परिवर्तन घडवण्याचे काम आहे त्याचे काय ? त्याकरता परिवर्तनाला सुसंगत असे विचार, निश्चित कार्यक्रम व त्यानुसार कृती ह्या गोष्टी संघाकडे आहेत काय ? तसे नाही असे श्री. गं. ना जाणवते आहे. कारण ते जगात आज काय चालले आहे हे उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. कृषिप्रधान चीनने स्वत:च्या देशाच्या उन्नतीकरता चालवलेल्या भव्य प्रयोगाचे महत्त्व त्यांना कळले आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे प्रत्यक्ष जनसमूह जागे होऊन सामूहिकपणे समाज बदलत असतात हा धडा त्यांनी घेतला आहे. जनसमूह उठवण्याकरता व प्रगतीचा शास्त्रशुद्ध कार्यक्रम राबवण्याकरता जे लागते ते संघामध्ये नाही हा दुबळेपणा त्यांना स्पष्ट दिसतो आहे.
आणि म्हणून त्यांनी खालीलप्रमाणे उपाय सांगितलेला आहे. सत्तेपासून पूर्ण अलिप्त राहून, निष्काम वृत्तीने समाजपरिवर्तन करणारा एक यतीवर्ग ही संघाची बैठक आहे. गांधीजींनी जेव्हा काँग्रेसचे लोकसेवादलात रूपांतर करावे अशी कल्पना मांडली ती हीच होती. पण गांधीवादी सत्तेच्या मागे लागले व हे स्वप्न साकार झाले नाही. हे अपयश धुवून काढून, जगासमोर 'दंडहीन समाजक्रांतीचा एक नवाच प्रयोग' उभा करण्याची ऐतिहासिक संधी संघाला आहे असे ते म्हणतात. संघटना, समाजपरिवर्तनाच्या दिशेने कृती आणि राजसत्तेपासून अलिप्तता ही त्रिसूत्री संघाने मानावी हा याचा अर्थ आहे. त्याला ते संघ व गांधीवाद यांचा मेळ घालणे म्हणतात.
१३ जुलैच्या प्रज्वलंत साप्ताहिकात नवे सरसंघचालक प. पू. बाळासाहेब देवरस यांच्या, १५०० संघ कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणाचा वृत्तांत आहे. ते म्हणतात की, (१) लोकांच्या टीकेमुळे संघ कार्यकर्त्यांनी वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करायला लागले पाहिजे. (२) संघाने सामाजिक समस्या सोडवण्याबाबत भरीव कार्य करून जनतेच्या संघाकडून असलेल्या अपेक्षा पुऱ्या केल्या पाहिजेत. (३) राजसत्तेशी संघर्ष घेणे संघाला मान्य नाही. कारण कोणत्याही पक्षाचे शासन असले तरी शेवटी ते राज्य आपलेच आहे अशी आमची धारणा आहे. आम्ही फक्त वाईटाविरुद्ध प्रतिकार करण्याची शक्ती समाजात आणू बघतो.
यावरून हे स्पष्ट आहे की, श्री. गं. नी सांगितलेला मार्ग संघाच्या नव्या