हा विसाव्या शतकाचा उत्तरार्ध आहे. राजसत्तेच्या विस्ताराची हद्द झाली आहे. सामाजिक आणि सांस्कृतिकच केवळ नव्हे, वैयक्तिक जीवनाचे नियंत्रणही राजसत्तेकडे गेलेले आहे, आपणहून लोक ही पुरोगामी गुलामगिरी स्वीकारीत आहेत. जयप्रकाश या प्रवृत्तीला समाजवाद न म्हणता राज्यवाद म्हणतात. विनोबांनी हा रावण वाढतो आहे अशी भीती व्यक्त केली आहे. हा एक गांधीजी आणि गुरुजी यांच्या परंपरेतील समान धागा आहे. हा जोडला गेला तर आज बोकाळलेले नैराश्य आणि वैफल्य काही प्रमाणात नक्कीच दूर होऊ शकेल. श्रीगुरुजींना यापेक्षा अधिक अर्थपूर्ण श्रद्धांजली कोणती असू शकते ?
♦
जून १९७३
एक चर्चा
गुरुजींनंतरचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सुधीर बेडेकर , संपादक तात्पर्य मासिक, पुणे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक गोळवलकर गुरुजी या दोन गोष्टी गेली कित्येक वर्षे एकमेकांपासून वेगळ्या काढताच येत नसत. डॉ. हेडगेवार याच्यानंतर गुरुजींनीच आपले परिश्रम, संघटनाकौशल्य आणि एकाग्र निष्ठा ओतून संघ जोपासला आणि वाढवला. त्यांच्या निधनानंतर संघाचा, त्याच्या कार्याचा आणि भविष्याचा वेगळा विचार होऊ लागल्याचे दिसते आहे.
दोन वेगवेगळ्या ठिकाणहून मांडले गेलेले विचार पहाण्यासारखे आहेत. 'माणूस' चे संपादक श्री. श्री. ग. माजगावकर यांनी 'माणूस' १६ जून १९७३ या अंकात संघाच्या पुढील ध्येयधोरणाला दिशा दाखवणारा (वरील) लेख लिहिला आहे. श्री. श्री. ग. एकेकाळी संघाचे कार्यकर्ते होते. त्यांना संघाची विचारप्रणाली, रचना आणि कार्य यांची चांगली माहिती आहे. संघाची शक्ती कशात आहे आणि दुबळेपण कशात आहे हेही ते जाणतात. अत्यंत सुसंघटित, शिस्तबद्ध