पान:बलसागर (Balsagar).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राष्ट्रवादाची भाषा होती. पण 'राष्ट्रीय समाज' येथे निर्माण होत नव्हता. त्यामुळे भाषा आणि कृती, निष्ठा आणि व्यवहार यात कुठेच कुणाचा मेळ बसण्याची शक्यता नव्हती. आणीबाणीच्या प्रसंगी आमचे नेते विशुद्ध राष्ट्रीय भूमिकेवर आरूढ होऊन तत्त्वशुद्ध निर्णय घेण्यास आणि कणखर कृती करण्यास असमर्थ ठरत होते; आणि जनताही नेत्यांच्या तत्त्वभ्रष्टतेबद्दल उदासीन होती. त्यांना जाब विचारण्याएवढी जागृत नव्हती. केवळ काँग्रेस नेत्यांच्याच बाबतीत हे घडत होते असे नाही. राष्ट्रनिष्ठेची जोपासना करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कृतीत आणि उक्तीत तरी कुठे मेळ होता ! सामाजिक प्रवाहांशी निष्ठेचा संबंध नसल्याने प्रवाहाला वळण देण्याची तिची शक्तीही ऐनवेळी सुप्तच राहिली. तीच दशा आमच्या साम्यवाद्यांची. चीनचा साम्यवादी हा प्रथम ‘चिनी' होता. रशियाचा साम्यवादी हा प्रथम 'रशियन' होता. आमचा साम्यवादी प्रथम केवळ मार्क्स-लेनिनचा भक्त होता. चांगला साम्यवादी प्रथम चांगला राष्ट्रवादी असतो. परंतु येथे औद्योगिक क्रांती, त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या राष्ट्रीय जाणीवा, या जाणीवा कामगारांपर्यंत पोहचविणारे वर्गलढे, ही सर्वच नैसर्गिक वाढ खुरटलेली असल्याने येथे 'भारतीय ' साम्यवादी पक्ष उभा होण्याऐवजी मॉस्को वा पेकिंगची एखादी शाखाच काम करीत असल्यासारखा सर्व प्रकार होता. रशिया महायुद्धात दाखल झाल्याबरोबर या साम्राज्यशाही युद्धाचे लोकशाहीयुद्धात रूपांतर होते, या गौड 'बंगाला' ची एरव्ही संगतीच लावता येत नाही.
 वैयक्तिक गुणदोष दिग्दर्शनाऐवजी ही सामाजिक कारणपरंपरा ध्यानात घेतली गेली असती, तर फाळणीच्या प्रमादानंतर तरी आम्ही सावध झालो असतो. गांधीजींची हत्या येथे घडली नसती आणि नवभारताच्या उभारणीला राष्ट्रीय जाणीवेचे भावनात्मक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा आम्ही प्रथमपासून प्रयत्न केला असता. स्वतंत्र झाल्यावर पंधरा वर्षांनी आम्हाला 'राष्ट्रीय एकात्मता मंडळ' स्थापावे लागावे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मग पंधरा वर्षे जे प्रकल्प रचले, योजना आखल्या त्यातून साधले काय ? समाज राष्ट्रीय दृष्ट्या संघटित होण्याऐवजी तो कमजोरच होत असेल, तर उभारणी पायाशुद्ध नाही हे स्पष्ट आहे. उभारणी म्हणजे देश आपल्या पायावर, आपल्या साधनसामुग्रीच्या बळावर स्वयंपूर्ण व स्वावलंबी करणे. या उलट आज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र उधारउसनवारीचा दिवाळखोर मामला सुरू आहे.

 विकास थोडा सावकाश चालेल, पण न पेलणारी व न पचणारी परकीय मदत घेऊन नवी आर्थिक गुलामगिरी पत्करणे धोक्याचे आहे. जुन्या परंपरागत संस्कार केन्द्रांना आवाहन करून नव्या काळाच्या प्रेरणा व विचार जनतेच्या

।। बलसागर ।। ५