पंधरा वर्षांपूर्वी देशातील राष्ट्रवादी शक्ती कमजोर होत्या, हेच या ऐतिहासिक पराभवाचे मूळ सामाजिक कारण आहे. राष्ट्रवाद हे आधुनिक काळातील उदयोन्मुख भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे राजकीय तत्त्वज्ञान आहे. या तत्त्वाच्या यशासाठी जे संघर्ष खेळावे लागतात, त्यासाठी जुन्या सरंजामशाही युगातील धार्मिक व जातीय निष्ठांना मागे टाकून शुद्ध राष्ट्रीय जाणीवा धारण करणारा नवा वर्गच समाजात प्रभावी व्हावा लागतो. हा औद्योगिक क्रांतीमुळे पुढे आलेला, स्वदेशी कारखानदारीवर वाढलेला व पोसलेला नवा वर्गच प्रसंगविशेषी कणखर राष्ट्रीय नीती आचरू शकतो व जुन्या निष्ठांच्या उद्रेकांशी समोरासमोर सामना देण्यास समर्थ असतो. औद्योगिक क्रांतीतून जन्मास आलेला समाजच राष्ट्रवाद समजू शकतो, पेलू शकतो, त्याच्या यशासाठी झगडू शकतो. कारण त्या समाजाच्या भौतिक विकासाआड जुन्या, धार्मिक व जातीय निष्ठा येत असल्याने त्यातून बाहेर पडण्याकडे त्याची स्वाभाविक अंतःप्रवृत्तीच असते. लिंकनच्या मागे उत्तर अमेरिकेची औद्योगिक क्रांती व त्यानुषंगाने पुढे आलेला कारखानदारवर्ग व पांढरपेशा समाज उभा होता. म्हणूनच तो निग्रोंच्या गुलामगिरीवर जगणाऱ्या अमेरिकेतील दक्षिण संस्थानांच्या यादवीला तोंड देऊ शकला, तिचा बीमोड करून अमेरिकेतील नवी औद्योगिक क्रांती स्थिरावू शकला.
आमच्या गांधी-नेहरूंच्या किंवा सरदारांच्या मागे कोण होते ? भांडवलदार जरूर होते; पण औद्योगिक क्रांती नव्हती. खरी भांडवलशाही अर्थव्यवस्थाही नव्हती. औद्योगिक क्रांती घडून येण्यास देशातील साधनसामुग्री गतिमान करणारा कल्पक, धाडसी व कष्टाळू असा कारखानदारवर्ग पुढे यावा लागतो. भारत ही ब्रिटिशांची एक वसाहत असल्याने येथे अशा प्रकारची स्वदेशी कारखानदारी वाढूच शकलो नाही. कच्चा माल परदेशी पाठवून पक्क्या मालाची आयात करणारा व दोन्ही बाजूंनी नफा उकळून केवळ धनाची रास वाढविणारा एक पूंजीपती मध्यस्थ दलालवर्गच येथे अस्तित्वात येऊ शकला. यामुळे जुनी अर्थव्यवस्था कोलमडली हे खरे; पण नवी आली ती उपरी, अर्धवट व अंधानुकरणावर आधारित,म्हणून दुबळी होती. तिच्याजवळ या भूमीची स्वयंप्रेरणा नव्हती. त्यामुळे येथे पुंजीपती निर्माण झाले, उद्योगपती अस्तित्वातच नव्हते. आर्थिक परिवर्तन झाले, क्रांती येऊ शकली नाही.
आर्थिक क्रांती दुबळी म्हणून त्याबरोबर येणारी मानसिक व सामाजिक क्रांतीही तशीच निःसत्व व उपरी. औद्योगिक क्रांतीबरोबर येणारे देशाभिमान, व्यवसायनिष्ठा, उद्योगप्रवणता, धडाडी, वैज्ञानिक दृष्टी, हवकांची व कर्तव्यांची जाणीव हे मानसिक सद्गुण येथे वाढीस लागूच शकले नाहीत. येथे