पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रशिक्षकासाठी टिपण- गटप्रमुख प्रशिक्षण १
गटप्रमुखांचे हे पहिले प्रशिक्षण आहे. त्यामुळे ह्या प्रशिक्षणात सभासदांपेक्षा गटप्रमुख कुठे आणि कसे वेगळे आहेत, त्यांच्या वेगळ्या काय जबाबदाऱ्या आहेत हे वारंवार सांगावे.

मग काय करायचं?

१) गट एकाच गावातल्या महिलांचा असावा म्हणून शिंदेवाडीच्या सरपंचाला ससेवाडीच्या गटात घेऊ नये. ती सरपंच असल्यानेही जास्त अधिकार गाजवू शकते. कुठल्याही शासकीय योजनांना हा गट जोडायचा नसला, तर शिंदेवाडीच्या सरपंचाला व्यक्ती म्हणून गटात घेण्यात काहीही व्यावहारिक अडचणी नाहीत.
२) गटप्रमुख नेहमी कर्ज घेते हे चुकीचे. गट फक्त गटप्रमुखांच्याच फायद्यासाठी नसतो. खरं तर गटप्रमुखाने सर्वांची नड भागल्यावर कर्ज घ्यावे. असे जी करते त्या गटप्रमुखाच्या पाठीशी सारा गट उभा राहतो असे अनुभव सांगतो. पण सारखे कर्ज घेणाऱ्या गट प्रमुखाबद्दल त्याच गटातल्या सभासद फारसे चांगले बोलत नाहीत. जरी परतफेड होत असली, तरी गट प्रमुखाने असे वागणे कटाक्षाने टाळावे.
३) कविताशिवाय गटात कुणी साक्षर /जबाबदारी घेणारी असली तर कविताला तूर्त प्रमुख करू नये. कारण हे तिचं पहिलंच बाळंतपण. त्यामुळे त्यात तिचं साधारणपणे वर्ष जाणार. सासर-माहेर होणार. पुढं बाळ लहान म्हणून वर्षभर जमेल असं नाही. त्यात ती नवी सून ! तिचा जाणत्या, वयाने मोठ्या बायकांवर दबाव कसा पडणार ? एक वेळ प्रमुखाला लिहिता आलं नाही तरी चालेल. ते कोणाकडून तरी करून घेता येईल. पण गटावर नियंत्रण मात्र ठेवता यायलाच हवं. कविताला एखाद दोन वर्षानंतर ही संधी जरूर द्यावी.
४) पैसे वाटताना कुठल्या गोष्टी विचारात घ्याव्यात यावर चर्चा व्हावी. जसे - कर्जाचे कारण उत्पादक असेल तर प्राधान्य द्यावे. कर्जाची तातडी किती? म्हणजे जसे - कदाचित पोरीचे कपडे पुढच्या महिन्यात चालतील पण बी-बियाणे तेव्हाच घ्यायला हवे. मागणी करणारीच्या नावावर आधी कर्ज आहे का ? असा विचार करायला प्रमुखाला शिकवावे.
५ ते ८) या विधानांना ठराविक एक उत्तर नाही. ह्यात गटप्रमुखांनी काय उत्तरे लिहिली आहेत यावर चर्चा करावा. उत्तरांची वर्गवारी करावी. काय करावे ? काय करू नये ? असे केल्यास काय काय घडते ? असे प्रश्न प्रसंगांवर विचारावेत.
उदा :- विधान ७ मध्ये पाटलाकडे गट घ्यावा का ? उत्तर 'हो' असेल, तर का? 'नाही' असेल तरी का? असे विचारावे. गट घेतला तर काय होईल ? घेतला नाही तर काय होईल? यावर चर्चा घ्यावी. गट घेतला नाही तर तिचे पाटीलपण नडेल का ? यावर गटात चर्चा घ्यावी व गटात पाटील किंवा मजूर सर्वजणी सारख्याच हे पुन्हा एकदा सांगावे.
प्रश्नातील विधानासारखे अनुभव (चर्चेच्या वेळी) एखादीला असल्यास तसे आवर्जून सांगायला सांगावेत म्हणजे प्रशिक्षण जास्त सहभागी पद्धतीने होईल.

★★★★★