पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गटाचे नियम

 बचत गटाचे नियम अनुभवानं बदलतात. गट हे सभासदांचेच असायला हवेत. एखादा बचत गट सुरू होतो तेव्हा नियम ठरतो, गटात आलं नाही तर दंड रु. २/- गट चालू असतो. मग लक्षात येतं नुसती बचत भरणारी आली नाही तर बिघडत नाही, पण परतफेड करणारी आली नाही तर बिघडते. मग पुढचा नियम ठरतो. परतफेड झाली नाही तर रु. १० दंड, म्हणजे ती व्यक्ती आली पाहिजे. मग हा नियम लावून धरताना काही काळ लोटतो.
 एखादीच्या नावावर रु. ५०० कर्ज असतं तर एखादीनं रु. १०,००० कर्ज उचललेलं असतं. मग दोघी एका महिन्यात गैरहजर राहिल्या तर गटाला सारखाच फरक पडतो का? नाही ! असं अनुभव सांगतो. ५०० रु. कर्ज बाकी असणारी सभासद आली नाही तर फारसं बिघडत नाही, पण १०,००० रुपये बाकी असणारी कर्जदार आली नाही तर बिघडतं ! असं गटाला वाटायला लागतं..... असं वाटणं चूक आहे का ? नाही. मग नियम ठरला परतफेड न झाल्यास व्याजाइतका दंड म्हणजे जिचं व्याज जास्त तिची हजेरी महत्त्वाची.
 मग हे असे नियम बदलणं स्वाभाविक आहे, असं आपण म्हणायला पाहिजे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन असे नियम बदलतात हे गटाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे, असंच आपण मानायला हवं!
 गट हे 'सभासदांचेच' असायला हवेत, संस्थेचे किंवा बँकेचे गट म्हणण्याची पध्दत बनली, तर त्या गटात नियम बदलले जात नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

★★★★★