पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशिक्षकासाठी टिपण - सभासद प्रशिक्षण ५

चूक कोणाची?

प्रत्येक विधानावर चूक काय झाली अशी चर्चा करावी व मग याला जबाबदार कोण? अशी चर्चा करावी. यानिमित्ताने सभासद,गटप्रमुख यांच्या जबाबदाऱ्या सांगाव्यात व गटाच्या सभासदाच्या, गटप्रमुखाच्या आदर्श वागण्यांबद्दल आपापल्या भागातील अनुभव सांगत सत्र घ्यावे.
सर्वप्रथम चूक काय झाली हे ठरवावे.
१) चूक - बैठकीतच पैशाचे व्यवहार व्हायला हवे, तसे झाले नाही.
ही चूक पैसे देणाऱ्या सीताची व घेणाऱ्या शैलाची अशी दोघींची आहे.
चर्चा :- गटाचा नियम काय? हिशोबात पारदर्शकता हवी. व्यवहार सर्वांसमोर व्हावेत. याला कधी अपवाद चालेल? यावरही चर्चा व्हावी. अनुभव सांगताना अशा चुका घडल्यामुळे गटाचा कसा तोटा होतो हे सांगून सभासदाची जबाबदारी व गटप्रमुखाची जबाबदारी सांगावी.
२) |चूक - कोया अर्जावर सही केली.
ही चूक सही देणाऱ्या रेखाची व घेणाऱ्या जनाची अशी दोघींची आहे.
चर्चा :- बँक कागदपत्रावर सर्वांच्या सह्या कशासाठी आवश्यक आहेत? हे सांगावे. सही करताना कशासाठी सही करत आहोत? कशावर सही करतो? याविषयी जागरुकता हवी, अशी चर्चा व्हावी. सही करणं म्हणजे वर लिहिल्या जाणाऱ्या सर्व मजकुराची हमी घेणं आहे. एकदा सही केल्यावर नंतर मला काय माहीत? असं म्हणता येत नाही, याची कल्पना द्यावी.
३) चूक - नोंद करणे चुकले. / राहिली.
ही चूक पूर्ण गटाची आहे.
चर्चा :- सुजाताने लिहून घ्यायला हवे, रेणुकाने लिहायला हवे. चूक दोघींची आहे. हा व्यवहार गटासमोरच व्हायला हवा होता. लिहिण्याचे काम जरी रेणुकाचे असले तरी पैशाची जबाबदारी सर्व गटाचीच हे जास्त बरोबर आहे. चुकून असे झाले तर पुढच्या बैठकीत अहवाल वाचताना हे दुरुस्त व्हायला हवे. प्रशिक्षकाने चर्चेअंती चुकांना संपूर्ण गटच जबाबदार आहे हे वारंवार सांगावे.
४) चूक - स्वत:च्या पैशातून सुटे-बंदे एकदाच करायला हवे होते तसे केले नाही.
ही सरुची चूक झाली यात शंकाच नाही..
चर्चा :- गटात पैसे कुणीही गोळा केले तरी त्यावर लक्ष सर्वांचे हवे. गटाचे पैसे हे सरुचे नाहीत, गटाचे आहेत म्हणून जी पैसे घेते तिची जबाबदारी जमलेली रक्कम जमाखर्चपत्रकाशी जुळेपर्यंत ! आधी जमाखर्चपत्रकावर पैसे लिहावेत व मग पैसे घ्यावेत, ही पैसे घेण्याची पध्दत सर्वांना चर्चेच्या वेळी सांगावी.
५) चूक - कर्जफेड कर्जपुस्तकात दिसली नाही.
ही चूक सुशीलाची आहे.
चर्चा :- बँकेचे कर्ज घेतले की त्याचे खाते वेगळे असते. त्यातच कर्ज हप्ता भरायला हवा. पहिला हप्ता भरताना चौकशी करून भरायला हवा होता. या निमित्ताने कर्ज फेड हप्ता वेगळ्या खात्यात भरायचा असतो व माहित नसणाऱ्या गोष्टी विचारायला लाजायचे नाही, यावर बोलावे.
चूक-भीमाला पैसे कमी मिळाले.
ही चूक भीमाची.
चर्चा :- भीमाने पैसे मोजून घ्यायला हवे होते. तसेच राधानं पैसे मोजूनच द्यायला हवे होते. गटात झालेला व्यवहार प्रमाण मानावा - पैसे मोजून देणं व घेणं हा व्यवहार आहे. हा कुणावरच्या विश्वासाचा प्रश्न नसतो. हे पुन्हा पुन्हा सांगावे. अशा चुका नंतर दुरुस्त करता येत नाहीत. पण अशा चुका गटाचं 'मत' गावात बनवत असतात. म्हणून चुका होऊच नयेत, अशी काळजी घेण्याविषयी सांगावे.

★★★★★