पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नावावर ना शेतातल्या ओंजळभर धान्यावर तिचा अधिकार. तिला ओळख मिळाली ती तिच्या बचतगटामुळे! अत्यंत नियमित उपस्थिती आणि नियमित परतफेड यामुळे गटात आणि बँकेतल्या अधिका-यांमध्येही सावित्राची पत तयार झाली. म्हणूनच गटातील खात्याबरोबरच तिचे व्यक्तिगत खातेही खोलले. खाते खोलताना बँकेच्या अधिका-यांनी तिला पूर्ण सहकार्य केले. आज त्याच खात्यावर तिने भाग्यश्रीच्या शिक्षणासाठी कर्ज काढले होते. त्यामुळेच तिची मुलगी इतक्या धीटपणाने एवढ्या मोठ्या लोकांसमोर तिची मते मांडत होती.
 बँकेबद्दलची कृतज्ञता तिच्या मनात दाटून आली. जे तिला घरातून मिळालं नव्हतं ते मानाचे स्थान आज बँकेमुळे तिला मिळालं. ती आज ‘मुलीची पालक' म्हणून कॉलेजमधील कार्यक्रमासाठी शिक्षकांनी दिलेल्या निमंत्रणावरून हजर होती! तिचा मुलगा महेशही हल्ली कोणतीही गोष्ट करताना तिला विचारू लागला होता. एकूणच तिला मिळालेल्या या आर्थिक बळामुळे तिचं असणं हेही सार्थ झालं होतं. त्याला अर्थ मिळाला होता.
 कार्यक्रमाहून परतल्यावर हे सगळे बँकेतील अधिका-यांना ती सांगणार होती. ती सांगणार होती की लहान माणसांना या ओळखीची किती गरज असते ते! रेशन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, गटाचे पासबुक हे सगळे-सगळे त्यांच्यादृष्टीने खूप महत्त्वाचे असते. या सगळ्यांमुळे त्यांना समाजात एक ओळख मिळते. एक महत्त्व मिळते. त्यांचे असे एक वजन तयार होते. नाहीतर भाग्यश्रीचे वडील, आजा सगळे सगळे असताना भाग्यश्रीच्या शिक्षणासाठी सावित्राने कर्ज काढले म्हणूनच केवळ भाग्यश्रीचे भाग्य उजळले असे कोण म्हणाले असते? तिच्या कष्टांचे माप तिच्या पदरात कोणी घातले असते?
 बँका ठिकठिकाणी करीत असलेल्या या महत्त्वाच्या कामाचा, त्यांच्या माहितीपत्रकात कुठेच उल्लेख नसतो. बचत गटातल्या आयांना ख-या अर्थाने कर्ते बनविण्याचे काम, सगळ्या स्त्रियांना मानाने पैशाशी निगडित काम करण्याची संधी देण्याचे काम! समाजातील त्यांची पत वाढवण्याचे काम ! ही कामं सुद्धा खूप महत्त्वाची आहेत..........सावित्रा विचार करत होती.
...... ह्या विचारांबरोबरच टाळ्यांच्या कडकडाटामुळे सावित्रा भानावर आली.

*****