पान:फुलाचा प्रयोग.djvu/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " सैताना, ही, मुलगी मला मिळाली पाहिजे. तिच्याशिवाय मी जगणार नाही. तिच्याशिवाय मला चैन पडणार नाही. कोणतीही युक्ती कर. वाटेल ते कारस्थान कर, परंतु ती मला हवी. " माधव म्हणाला.
 घाबरू नकोस. तुझ्या इच्छा पुरविणारा मी परमेश्वर आहे. चल माझ्याबरोबर. तिकडे आपण गंमत करू. " सैतानाने सांगितले.
 दोघे चालू लागले. थोड्या वेळाने एका लहानशा घराजवळ सैतान थांबला.
 " का थांबलाससा ? " माधवाने विचारले.
 " हे तिचे घर. " सैतान हसून म्हणाला.
 " मग ?"
 " हा मोत्यांचा कंठा ह्या खिडकीतून आत फेक. " सैतानाने सांगितले. तो एक सुंदर हार होता. करवंदाएवढी मोती होती. सैतानाने तो माधवाच्या हातात दिला. माधवाने खिडकीतून तो आत फेकला.
 " पुढे काय ? " त्याने विचारले.
 " येथेच जरा थांबू. काय होते ते पाहू. " सैतान म्हणाला.
 दोघे बाजूला उभे राहिले, काही वेळाने ती मुलगी आली. ती घरात गेली. ती आपल्या खोलीत शिरली. तो तेथे तो मोत्यांचा हार. त्या हाराकडे ती बघत राहिली. कशी टपोरी मोती, किती पाणीदार ! तिने हळूच तो हार उचलला. तिने तो आपल्या गळ्यात घातला. तिने आरशात पाहिले. तिच्या गोऱ्या गोऱ्या गळ्यात तो खुलून दिसत होता. परंतु कोठून आला तो हार ? आईला सांगितले पाहिजे.
 तिकडे त्या मुलीची आई काम करीत होती.
 " आई आई, हा बघ मोत्यांचा हार. माझ्या खोलीत होता. कोणी टाकला, कोठून आला ? मी घेऊ का तो ? हा बंघ मी गळ्यात घातला आहे. छान दिसतो नाही ? माझ्या गळ्यात ना दंड ना एकदाणी. ओका-ओका दिसे गळा, नाही ? आता कसा दिसतो बघ. बघ ना आई. तू हातात घेऊन बघ. पुष्कळ असेल किंमत, नाही ? " मुलगी आनंदाने सांगत होती.


मधुरीची भेट ६९