Jump to content

पान:फुलाचा प्रयोग.djvu/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आईने तो कंठा हातांत घेतला. नीट पाहून ती म्हणाली, “आपल्याला नको ग बाई हा कंठा. गरिबांना असले दागिने काय कामाचे ? कोणी चोरीचा आळही घ्यायचे. आपण हा हार रामाच्या देवळात नेऊन देऊ रामाला होईल. देवाच्या गळ्यात शोभेल. "
 " देवाच्या गळ्यात तरी तो राहील का ? रामाचे दागिने वेश्यांच्या आंगावर गेले, तसा हा हारही जाईल. रामाचा मालक नावाचा रामाचा मालक. जे रामाला दिले जाते, रामापुढे ठेवले जाते, ते त्याच्या प्रियकरणी - कडे जाते. त्यापेक्षा माझ्या गळ्यात असला म्हणून काय बिघडले ?"
 " तुला कळत नाही. आपण चोरीची वस्तू कशी वापरायची ? जी वस्तू आपली नाही ती वापरणे म्हणजे चोरी. आपण रामाला नेऊन देऊ. तो पुजारी मालक काहीही करो. त्याचे पाप त्याला. "
 " परंतु त्याच्या पापाला आपण उत्तेजन देतो. आपणाला माहीत असून त्याच्या हातांत संपत्ती देणे म्हणजे आपणही पापी. "
 " तू फारच बोलायला शिकलीस. तुझी आई साधी-भोळी आहे. आपण श्रद्धेने करावे. आपल्यापुरते पाहावे. जा, ती धुणी धुवून आण. तुला काम नको. नटायला मात्र हवे. राणीच्या पोटी का आली नाहीस ? माझ्यासारखीच्या पोटी आलीस. आता कर काम. रडायला काय झाले ?"
 ती मुलगी आपल्या खोलीत आली. ती रडत बसली. इतक्यात सैतान व माधव तिच्या खिडकीपाशी आले. सैतानाने आणखी एक हार माधवाच्या हाती दिला. त्याने तो खिडकीतून आत फेकला. त्या मुलीने तो हार पाहिला. तिने तो हातात घेतला. तिने गळ्यात घातला. पुन्हा तिने आरशात पाहिले.
 " किती छान दिसतो मला ! कोणाजवळ आहेत असे हार? हा हार आता आईला नाही दाखवणार ? लपवून ठेवीन. किती सुंदर हार ! कोणाजवळ आहेत असे हार, कोणाजवळ आहे इतकी संपत्ती ? कोण फेकते हे हार ह्या खिडकीतून ? " ती मुलगी स्वतःशी बोलत होती.
 " माझ्याजवळ आहेत असे हार. मी फेकले ते. तुझ्यासाठी मी प्राणही फेकीन. मग हारांचे काय ? तू माझ्यावर रागावून गेलीस. परंतु पुन्हा मागे वळून पाहिले होतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझी हो. तुला


७० फुलाचा प्रयोग