" मीट डोळे, मीट डोळे. " सैतान म्हणाला.
माधवाने डोळे मिटले. हवेतून दोघे जात होते. सैतानाने डोळे उघडायला सांगितले. तो कोण दिसले समोर ? पिशाञ्चलोकी ते आले होते. जखिणी, डाकिणी, समंध, भुते सर्वांची तेथे गर्दी होती. अक्राळ-विक्राळ भेसूर रूपे. डाकिणींचे केस सोडलेले होते. कडकड कडकड दात खात त्या डाकिणी आल्या. त्यांची नखे म्हणजे जणू सुया. त्यांनी माधवाला मिठी भारली.
" हे काय ? बोचल्या सुया. सोडा मला. मला मारू नका, खाऊ
नका." माधव म्हणाला.
" दूर उभ्या राहा. " सैतानाने आज्ञा केली.
" आम्ही तुम्हांला आलिंगन देत होतो. तुम्हांला भेटत होतो. असे घाबरलेत काय ? " त्या डाकिणी विकट हसून म्हणाल्या.
" हे पाहा. हे पाहुणे दमले आहेत. त्यांना एक पेलाभर ते पेय घेऊन या. जा. " सैतान म्हणाला.
माधव सर्वत्र पाहात होता. कोणी भुते हिरकुटासारखी बारीक, परंतु उंचच उंच होती. पेटलेल्या उदबत्तीसारखी ती दिसत, डोळे लाल लाल, कोणी पिशाचे विष्ठा खात होती, तर कोणी चिखलात लोळत होती. कोणी नाचत होती, तर कोणी घोरत होती. माधवाला वीट आला ते सारे पाहून.
इतक्यात एक डाकीण पेयाचा पेला घेऊन आली. तो पेला मात्र सुंदर दिसत होता. जणू सूर्यकिरणांचा तो बनलेला होता. त्या स्वच्छ शुभ्र पेल्यात ते पेय फारच खुलत होते. ते पेय उसळत होते. सुवास सुटला होता.
“ घे हा पेला. पी. आणखी लागले तरी आणू. " सैतान म्हणाला.
" पिऊ ? धोका तर नाही ना ? " माधवाने विचारले.
" मी तुझा सेवक आहे. मी कसा फसवीन ? नि:शंकपणे पेला रिकामा कर. मधुर सुंदर रस. देवांनाही हा दुष्प्राप्य आहे.
माधवाने पेला हाती घेतला. भुते नाचू लागली, गाऊ लागलो. भुतेरी वाद्ये वाजू लागली. पाहुण्यांचे स्वागत होत होते. माधव साशंक होता.
" पी, भल्या माणसा, पी. भित्रेपणा तुला शोभत नाही."
६६ * फुलाचा प्रयोग