पान:फुलाचा प्रयोग.djvu/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " तुला ज्याची जरूर आहे तोच मी. "
 " माझ्या सर्व इच्छा पुरवशील ? मला पाहिजे ते देशील ? "
 " ही. तुला जे पाहिजे ते देईन. एवढेच नव्हे तर जगातील सारी सुखे तुला चाखवीन, केवळ मनुष्ययोनीचीच नव्हे, तर भूतयोनीतील, पिशाच्च लोकातीलही सुखे तुला दाखवीन. तुला सर्वत्र हिडवीन, फिरवीन. जीवनातील मौज दाखवीन. "
 " परंतु ह्याबद्दल तुला काय देऊ ?"
 " मला पैशाचा मोबदला नको. आपण असे ठरवू या. बारा वर्षेपर्यंत मी तुम्ही जे जे सांगाल ते करीन. जे-जे मागाल ते देईन. बारा वर्षे मी तुमचा गुलाम आणि बारा वर्षे संपली, बाराव्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे रात्रीचे बारा वाजले, की तू माझा गुलाम व्हायचास. कायमचा गुलाम. आहे कबूल ?
 " असा कालावधीचा करार नको. तुम्ही मला सुखे देत राहा, निरनिराळे अनुभव देत राहा. ज्या वेळेस ' हा क्षण किती सुंदर, हा क्षण माझ्या जीवनात अमर होवो' असे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडतील, त्या वेळेस मी तुमचा गुलाम होईन. पटले का तुम्हाला ?"
 " ठीक. तू म्हणतोस तसे का होईना ! ठरले. आजपासून मी तुझा बंदा सेवक. मला वाटेल ते सांग, मजजवळ वाटेल ते माग."
 " मला जगाचा अनुभव नाही. तूच मला जे-जे योग्य असेल ते देत जा. माझ्या तोंडून ते शब्द बाहेर पडतील अशी खटपट कर."
 " बरे तर. मी आरंभ करतो. मीट डोळे, डोळे मोट. "
 " परंतु तुझे नाव सांग. "
 " माझे नाव सैतान. "
 " सैतान तो का तू ? वा, छान ! मिटू डोळे ? हे बघ मिटले. ” माधवाने डोळे मिटले. सैतान त्याला दूर घेऊन गेला.


६४ * फुलाचा प्रयोग