पान:फुलाचा प्रयोग.djvu/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोंबडीला खाईल, लांडगा कोल्ह्याला खाईल ; वाघ, सिंह सर्वांना खातील. चिमणी किडे खाईल, ससाणा चिमणीला खाईल. तेथे भूकंप होतात एकदम सारे गडप होते. ज्वालामुखीचे स्फोट होतात व आगीचा वर्षाव होऊन लाखो जीव त्यात मरतात. त्या पृथ्वीवर नाना रोग, नाना साथी. तेथे प्लेग आहे, कॉलरा आहे; मानमोडी आहे, विषमज्वर आहे ; देवी आहेत, गोबर आहे; घटसर्प आहे, काळपुळी आहे ; कोणी आंधळे आहेत, कोणी पांगळे आहेत ; कोणी मुके आहेत ; कोणी बहिरे आहेत आणि त्या मनुष्यप्राण्याची कशाला स्तुती करता ? काय आहे त्या मानवात ? मनुष्यप्राणी आज हजारो वर्षे झाली तरी आपसांत झगडत आहे. मनुष्य मनुष्याला छळीत आहे, पिळीत आहे, गिळीत आहे. एकमेकांना मारू पाहतात, एकमेकांना गुलाम करू इच्छितात. मारण्याची भयंकर साधने शोधीत असतात. कोणी घंटा वाजविण्याचा हट्ट धरतात. कोणी ती न वाजविण्याचा हट्ट धरतात. घंटेसाठी भांडणाऱ्यांचे का कौतुक ? कोणी तोंडाने शांतिमंत्र म्हणतात, आणि खुशाल रक्तपात करतात. शांतिधर्माचे, प्रेमधर्माचे उपाध्यायच युद्धांना उत्तेजन देतात. मारामारीस आशीर्वाद देतात. हा मनुष्यप्राणी वरून हसतो व मनात रडतो. गोड बोलतो, पोटात द्वेषाचे विष असते. मनुष्याजवळ सत्य नाही, न्याय नाही. आपल्या मनाला जे वाटले ते तो करतो आणि त्याचे समर्थन करण्यासाठी फक्त बुद्धी वापरतो. मनुष्यप्राणी म्हणजे मूर्तिमंत पाप. किती स्वार्थी, किती दांभिक; किती अहंकारी, किती धूतं ; मनुष्यप्राणी म्हणजे दुनियेला शाप. तो सर्वांचा संहार करील. स्वतःच्या जातींचाही करील. तो पक्ष्यांना गमतीसाठी मारील व मग त्यांच्यात पेंढा भरून तो दिवाणखान्यात ठेवील. तो हरणे मारील व मग त्यांची शिंगे शोभेसाठी आणील. तो पक्ष्यांची पिसे जिवंत असता उपटील व त्या पिसांनी नटेल. ह्या मनुष्याकडे पाहू नये असे मला वाटते. मनुष्य म्हणजे वासनाविकारांचा गोळा."
 देवदूत सैतानाला थांबवू पाहात होते. परंतु परमेश्वर म्हणाला, " त्याला बोलू दे. सर्वांना मोकळेपणाने बोलण्याचे येथे स्वातंत्र्य आहे. आणखी बोलावयाचे आहे का ? मी शांतपणे सारे ऐकत आहे. सैताना, बोल, सारे मनातील बोल."

५४ * फुलाचा प्रयोग