सैतान म्हणाला," किती बोललो तरी सूर एकच. तुझी सृष्टी वाईट
आहे. ती पृथ्वी भेसूर आहे. मनुष्यप्राणी म्हणजे शापरूप आहे.
परमेश्वर म्हणाला," सैताना, मी तुला एकच सांगतो, शेवटी सारे
गोड होईल. आंबट कैरी पिकते. लहान नदी मोठी होते. नदी वेडीवाकडी
जाते. कधी उथळ, कधी गंभीर. परंतु शेवटी सागराला मिळते. तसाच
हा मनुष्यप्राणी. तो वेडावाकडा जाईल. कधी माकडासारखा वागेल. कधी
वृक-व्याघ्रांहून क्रूर होईल. परंतु शेवटी मांगल्याच्या सागराकडे येईल.
ह्या चिखलातून तो शेवटी डोके वर काढील व स्वतःचे जीवन कमळा-
प्रमाणे पावित्र्याने व माधुर्याने भरील. मला ही आशा आहे. मला ही
निश्चित खात्री आहे. तू पाहा एखादा प्रयोग करून ते पाहा सारे मानव
येथून दिसत आहेत. तुला जो पसंत पडेल त्याच्यावर प्रयोग कर. त्याला
पापाकडे नेण्याचा हट्ट धर. परंतु शेवटी तो सत्पंथाकडेच वळेल. तुझ्या
पापाचा शेवटी त्याला कंटाळा येईल. चिखलातच बेडकाप्रमाणे उडया
मारण्याचे तो बंद करील व गरुडाप्रमाणे उच्च जीवनात भरारी मारील.
करून पाहा प्रयोग बघ मानवाचा कायमचा अधःपात होतो का. जितके
त्याला खाली नेता येईल तेवढे नेण्याची पराकाष्ठा कर. परंतु मनुष्य
शेवटी वर येईल."
सैतान पृथ्वीवरच्या मानवांकडे पाहू लागला. हाती धरावा असा
एकही मनुष्य त्याला दिसेना. सारे दुबळे व भेकड. व्यक्तित्व कोणाजवळही
नाही. अशा बावळटांवर प्रयोग करण्यात काय अर्थ ? परंतु त्याला
इतक्यात एक मनुष्य दिसला. तो मनुष्य मोठा मनस्वी होता. तो कोणाचा
गुलाम नव्हता. मनात येईल ते न भिता करणारा होता. बेडर होता तो.
सैतानाला तो मनुष्य मानवला. ह्या माणसाजवळ करावा खेळ, ह्याच्यावर
करावा प्रयोग असे त्याला वाटले. बलवंताला बलवंताशी खेळायला
आवडते. सैतान परमेश्वराला म्हणाला, “ तो पाहा एक मनुष्य
त्याच्यावर मी प्रयोग करतो. जर मी हरलो तर तसे येऊन सांगेन.
सैतानही सत्याला मान देतो."
परमेश्वर म्हणाला, “ठीक. जा. प्रयोग कर. ने मानवाला खाली-
खाली. परंतु शेवटी तो चांगल्याकडेच वळेल. मला मुळीच शंका नाही."
- * *
देवाचा दरबार * ५५