पान:फुलाचा प्रयोग.djvu/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " आपण कोठे असता ? " राजाने विचारले.
 " एका खेडेगावात."
 " तुम्ही प्रयोगात यश मिळविलेत, आश्चर्य आहे."
 " देवाची कृपा."
 " तुम्ही नीट शास्त्रीय ज्ञान मिळविलेत तर आणखी चमत्कार कराल. आपल्या देशाचे नाव वाढवाल . तुम्ही शास्त्रज्ञ म्हणजे देशाची भूषणे. आपले मी अभिनंदन करतो. आपल्या ह्या देशाला तुम्ही मान मिळवून दिलात. धन्य आहात तुम्ही !"
 गब्रू निघून गेला. परंतु आता कळीची गाडी आली. ती शास्त्रज्ञांना भेटली. " हे फूल मी फुलवले आहे. ह्या लफंग्याने ते पळवून आणले आहे. " असे तिने सांगितले. परंतु तिच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देईना. " मला राजाची भेट घ्यायची आहे, राजाची माझी गाठ घाला.” असे ज्याला त्याला ती विनवू लागली.
 शेवटी राजाच्या कानांवर वार्ता गेली. एक मुलगी आपणास भेटू इच्छिते, असे त्याला कळले. त्याने त्या मुलीला बोलाविले. ती मुलगी आली. नम्रपणे ती उभी राहिली. नंतर राजाला तिने प्रणाम केला.
 " मुली, काय आहे तुझे म्हणणे ? " राजाने प्रश्न केला.
 " महाराज, ते फूल मी फुलविले आहे. " ती म्हणाली.
 " मोठ-मोठे शास्त्रज्ञ थकले. तू कसे फुलवणार ते फूल ?"
 " ही पाहा माझी रोजनिशी. हिच्यात झाड कधी लावले, कोणते खत घातले, कोणत्या रंगाचे किरण दिले ते सारे मी लिहून ठेविले आहे. "
 राजाने तो रोजनिशी वाचली. त्याने त्या मुलीकडे पाहिले.
 " तुझे नाव काय ?"
 " कळी. "
 " तुझा बाप काय करतो ?"
 " ते तुरुंगाचे अधिकारी आहेत.
 “ कोणत्या तुरुंगावर ?"
 " समुद्रकाठच्या. "

फुलाला दोन बक्षिसे ४५