पान:फुलाचा प्रयोग.djvu/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “ आपण कोण कुठले ? " ढब्बूसाहेबांनी विचारले.
 " मी मुशाफर आहे, मी एकटा आहे. घरी पाच लाखांची जहागीर आहे. मी जगात कोठे काय चांगले आहे ते पाहात हिंडत आहे. हा समुद्रकिनारा फार सुंदर आहे असे ऐकले म्हणून येथे आलो. "
 " आपण लग्न वगैरे नाही केले ? "
 " अजून नाही."
 " करायचे नाही का ?"
 " तसे ठरलेले काही नाही."
 " सृष्टीतील सुंदर वस्तू बघता बघता अनुरूप पत्नीही मिळायची ! "
 " योगायोगाच्या त्या गोष्टी असतात."
 " तुम्ही कोठे उतरला आहात?"
 " एका खाणावळीत."
 " आमच्याकडे या ना समुद्रावर फिरा. तुरुंगातील बागेत हिंडा. तुमच्यासारख्या सौंदर्यशोधकाची व्यवस्था लावणे म्हणजे पुण्य आहे."
 “ येईन तुमच्याकडे राहायला. तसे मला परके असे कोठेच वाटत नाही. मी घरातून बाहेर पडलो तो जगाचा मित्र होण्यासाठी. "
 " तुम्ही एकदम माझ्या विनंतीस मान दिलात ह्याबद्दल मी आभारी आहे. शिपाई तुमचे सामान आणतील. चला घरी. "
 पाहुणा वरच्यासारखा झाला. तो शिपायांना चिरीमिरी देई. सारे त्याच्यावर खूष असत. त्याला तुरुंगात सर्वत्र हिंडण्या-फिरण्याची मुभा होती. एके दिवशी तो बगीच्यात हिंडता हिंडता कळीने लाविलेल्या झाडाजवळ आला. ती पाने त्याने ओळखली. हाच तो प्रयोग असे त्याने जाणले.
 पाहुणा त्या पानांकडे बघत होता व त्या पाहुण्याकडे गजांतून फुला पाहात होता. इतक्यात कळी तेथे आली.
 " काय पाहाता इतके टवकारून ? " तिने विचारिले.
 " कळ्ये, हा मनुष्य कोण ? "
 " तो घरचा पाहुणा झाला आहे. म्हणतो, मी मोठा श्रीमंत जहागीरदार आहे. बाबांना त्याने भूल घातली आहे. साऱ्या शिपायांजवळ गोड बोलतो. त्याला वाटेल तेथे फिरण्याची सदर परवानगी आहे."


३८ x फुलाचा प्रयोग