पान:फुलाचा प्रयोग.djvu/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " तुम्ही मला सांगाल का वेल कसा लावायचा ? कंद कोणता घ्यायचा ? काय प्रयोग करायचे ? तुमच्या सांगण्याप्रमाणे मी सारे करीन.त्या बगीच्यात लावीन. येथून तुम्हाला बघता येईल अशा ठिकाणी लावीन.सांगता मला काम ? तुमचे जीवनातील काम मला सांगा. तुमच्या प्रयोगात मला रमू दे. तुमचा प्रयोग यशस्वी होऊ दे. "
 " कर माझे काम. माझ्या प्रयोगात भाग घे. हा घे तुकडा. हा तुकडा लाव. नीट खोल खणून लाव. मी सांगेन त्याप्रमाणे खत घाल, पाणी घाल. " तो म्हणाला.
 " तुमचे ते पुस्तक मी वाचायला शिकल्ये. मला समजते त्यातले. "
 " तुझे विचार वाढलेले होते. कल्पनाशक्ती वाढलेली होती. फक्त अक्षरांच्या खुणा समजायचा अवकाश होता. वाच. इतरही पुस्तके वाच."
 " मला चांगल्या पुस्तकांची नावे सांगा. ती पुस्तके मी मागून घेईन. देता पाटीवर लिहून ?"
 " हो. देतो. "
 त्याने पाटीवर चांगल्या पुस्तकांची यादी दिली. कळी निघाली. फुलाच्या प्रयोगाचा तो तुकडा घेऊन निघाली. तिसरे प्रहरी तो बगीच्यात गेली. तिने खालून वर पाहिले. फुला कोठडीच्या गजांजवळ उभा होता. तिने खणले. त्यात तो तुकडा तिने लावला. तिने वर पाहिले. दोघांची दृष्टी मिळाली. ती दृष्टी नव्हती. अनंत अशा मनांतील सृष्टीचा जणू तो दरवाजा होता. त्या दृष्टीतून मनातील सृष्टी दिसे.
 कळो रोज त्या लावलेल्या वेलाची बातमी सांगे. नंतर तेथे वाची. काही वेळ गप्पा-गोष्टींत जाई. दोघे एकमेकांचे हात क्षणभर हातात घेत.
 " हे गज कधी दूर होतील ? ही बंधने कधी तुटतील ? " तो म्हणे.
 " एक दिवस तुटतील. ती तुटोत वा न तुटोत. आपली मने अभंग जोडली गेली आहेत. खरे ना ? "
 " हो."
 एके दिवशी ढब्बूसाहेबांना भेटायला एक प्रवासी आला. त्याचा श्रीमंती पोषाख होता. बोटांतून आंगठ्या होत्या. मनगटावर सोन्याचे घड्याळ होते.

तुरुंगातील प्रयोग ३७